तुकाराम मुंढे : पुढील दौरा पुर्वकल्पना देणारा नसेल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 09:21 PM2018-07-01T21:21:18+5:302018-07-01T21:22:46+5:30
‘आज सर्वांना कल्पना देऊन पाहणी केली, यानंतर अचानक दौरा करेल, तेव्हा चित्र बदललेले असावे’, अशी तंबी देत सर्वच विभागप्रमुखांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फैलावर घेतले.
नाशिक : शहराच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असलेले महापालिकेने विकसित केलेले फाळके स्मारक, बुद्धस्मारक परिसराची झालेली दुरवस्था बघून महापालिकेचे प्रशासनप्रमुख हतबल झाले. ‘आज सर्वांना कल्पना देऊन पाहणी केली, यानंतर अचानक दौरा करेल, तेव्हा चित्र बदललेले असावे’, अशी तंबी देत सर्वच विभागप्रमुखांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फैलावर घेतले.
वनमहोत्सवांतर्गत वृक्षलागवडीच्या शुभारंभाच्या निमित्ताने मुंढे यांनी फाळके स्मारकाच्या आवारात हजेरी लावली. वडाचे रोपटे लावल्यानंतर उद्यानविभागाच्या कर्मचा-यांनी बुद्धस्मारक व फाळके स्मारकाच्या आवारात वृक्षारोपण पूर्ण केले. मुंढे यांनी मुख्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, विभागीय अधिका-यांना बोलावून घेत फाळके स्मारक व बुद्ध स्मारकाचा परिसर पिंजून काढला. यावेळी फाळके स्मारकातील बालोद्यानाची झालेली दुरवस्था आणि मोडकळीस आलेल्या खेळण्या बघून मुंढे यांचा पारा चढला. तसेच वॉटरपार्कचे प्रवेशद्वार उघडताच परिसरात प्रवेश केला असता त्यामधील विदारक चित्राने त्यांना धक्का बसला. खासगी तत्त्वावर प्रस्ताव तयार करून वॉटरपार्कचा दर्जा सुधारून कार्यान्वित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्याचे समजते. दरम्यान, या परिसराला सार्वजनिक अस्वच्छतेमुळे आलेल्या बकालपणाविषयीही त्यांनी नाराजी दर्शविली. फुटलेले पथदीवे, तुटलेल्या खेळण्या, गाजरगवताचे पसरलेले साम्राज्य, सार्वजनिक स्वच्छतागृहाची झालेली दुर्दशा, फुलझाडे, शोभिवंत झाडांभोवती साचलेला कचरा व वाढलेले गवत अशा एक ना अनेक समस्यांचे गलिच्छ चित्राने जणू महापालिकेच्या गलथान कारभाराचा आरसाच मुंढे यांना दाखविला. महापालिका प्रशासनप्रमुख या नात्याने फाळके स्मारकाची झालेली दुरवस्था बघून ते चांगलेच व्यथित झाले आणि संतापलेही. ‘यापुढे मी सांगून पाहणी दौरा करणार नाही, तर अचानक भेट देईल, त्यावेळी मला अशी अवस्था दिसता कामा नये’ असे सांगून धारेवर धरले.
चित्र पालटेल, पुन्हा वाढतील पर्यटक
तुकाराम मुंढे यांचा पाहणी दौ-यात दिलेल्या विकासाच्या सूचनांमुळे लवकरच फाळके स्मारकाचे चित्र पालटेल आणि पुन्हा पर्यटकांचा कल वाढेल, अशी चर्चा परिसरात रंगली होती. येथील पथदीपांपासून पाणपोई आणि स्वच्छतागृहांसह खेळण्यांच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. फाळके स्मारकाचे सौंदर्य लयास गेल्याने नाशिककरांनी या पर्यटनस्थळाकडे पाठ फिरविल्याने महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. मुंढे यांच्या पाहणी दौºयामुळे फाळके स्मारकाला पुन्हा वैभव प्राप्त होइल, अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.