नाशिक महापालिकेत देवबंदी, वाहनात मात्र गणराय!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 04:54 PM2018-02-13T16:54:04+5:302018-02-13T17:12:04+5:30
सोशल मिडियावरही त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया नोंदविल्या जात होत्या
नाशिक - महापालिका खातेप्रमुखांच्या कार्यालयातील देव-देवतांच्या तसबिरी, मुर्ती हटविण्याचे आदेश नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले असतानाच त्यांच्या शासकीय वाहनात मात्र, दर्शनी भागात बसविण्यात आलेली गणरायाची मूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे.
नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्याविषयी आचारांबरोबरच विचारांचीही सफाई होणे गरजेचे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनातील काही विभागांना भेटी देऊन पाहणी केली होती. याच पाहणी दरम्यान, त्यांना कार्यालयांमध्ये ठिकठिकाणी भिंतींवर, टेबलावर देवदेवतांच्या प्रतिमांसह मूर्ती आढळून आल्या होत्या. त्याबाबत मुंढे यांनी देवदेवतांच्या प्रतिमा-मूर्ती हटविण्याबरोबरच कार्यालयात साफसफाईचेही आदेश दिले होते. आयुक्तांनी दिलेल्या या आदेशानंतर महापालिका मुख्यालयात शनिवार-रविवार या सुटीच्या दिवशी युद्धपातळीवर साफसफाई मोहीम राबविली गेली. त्यात देवदेवतांच्या प्रतिमा-मूर्तीही हटविण्यात आल्या. देवदेवतांच्या प्रतिमा हटविण्याबाबतच्या या आदेशाबद्दल जनमानसात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. पुरोगामी संघटना-नागरिकांनी या आदेशाचे स्वागत केले तर धर्म-संस्कृती रक्षकांकडून विरोधी प्रतिक्रिया आल्या. त्यातच, कार्यालयात देवबंदी करणा:या आयुक्तांना महापालिकेने दिलेल्या वाहनात दर्शनी भागात गणपतीची मूर्ती असल्याची वार्ता पसरल्याने या विरोधाभासाबद्दल चर्चेला उधाण आले. सोशल मिडियावरही त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया नोंदविल्या जात होत्या. दरम्यान, आयुक्तांनी या देवबंदीचे समर्थन केले असून आचारांबरोबरच विचारांचीही सफाई महत्वाचे असल्याचे स्पष्टीकरण वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिले आहे.