वेद मंत्रोच्चारात तुलसी विवाह सोहळा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 01:27 AM2019-11-11T01:27:20+5:302019-11-11T01:27:37+5:30
वेद मंत्रांचा उच्चार, मंगलाष्टकांच्या आवाजाने भरलेले सभागृह आणि साजशृंगार करून आलेले पाहुणे यांच्या मांदियाळीत हारफुलांनी सजलेल्या तुलशी व श्रीकृष्णाचा थाटामाटात विवाह लावण्यात आला.
नाशिक : वेद मंत्रांचा उच्चार, मंगलाष्टकांच्या आवाजाने भरलेले सभागृह आणि साजशृंगार करून आलेले पाहुणे यांच्या मांदियाळीत हारफुलांनी सजलेल्या तुलशी व श्रीकृष्णाचा थाटामाटात विवाह लावण्यात आला. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा परिसर विविध दिवे, रोषणाई आणि फटाक्यांच्या आवाजाने दणाणून गेला होता. अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या सभागृहात रविवारी (दि.१०) तुलशी विवाह संपन्न झाला. संस्थेचे केंद्रप्रमुख सतीश करजगीकर व सुजाता करजगीकर या दाम्पत्याच्या हस्ते हा विवाह सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे पौराहित्य चंद्रशेखर गायधनी यांनी केले.
अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा उपक्रम :
तुलसी विवाह सोहळ्यानिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर दीपावली मीलन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. तुलसी विवाहानिमित्त संस्थेचा परिसर सुशोभित करण्यात आला होता. तुलसी विवाहानिमित्त विविध फळे-फुलांची सजावट, चौरंगावर विविध धान्यांच्या राशी, एका चौरंगावर साजशृंगार केलेली तुलसीचे रोपटे आणि समोर श्रीकृष्णाच्या मूर्तिलाही सजविण्यात आले होते. महापूजा झाल्यानंतर मंगलाष्टकांनी हा विवाह सोहळा पार पडला. आरतीनंतर प्रसाद वाटप करून विवाह सोहळ्याची सांगता झाली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.