भाजपाला अडचणीत आणण्याचा डाव
By admin | Published: March 10, 2017 02:10 AM2017-03-10T02:10:00+5:302017-03-10T02:10:13+5:30
महापालिकेत विरोधकांनी आता भाजपाला स्थायी समितीत अडचणीत आणण्याचे डावपेच आखणे सुरू केले आहे.
नाशिक : महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळल्याने त्यांचाच महापौर-उपमहापौर विराजमान होणार, हे निश्चित असल्याने विरोधकांनी आता भाजपाला स्थायी समितीत अडचणीत आणण्याचे डावपेच आखणे सुरू केले असून, आघाडी करण्याच्या हालचाली होत आहेत. मात्र, कोटापद्धतीनुसार भाजपाचे ९ सदस्य स्थायीवर जाणार असल्याने भाजपाचाच सभापती होणार असल्याचा दावा पक्षातील सूत्रांनी केला आहे.
महापालिकेत भाजपाचे ६६ सदस्य आहेत, तर शिवसेना- ३५, कॉँग्रेस- ६, राष्ट्रवादी- ६, मनसे- ५, अपक्ष- ३, रिपाइं- १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने भाजपाचा महापौर-उपमहापौर बसणार आहे. त्यामुळे विरोधकांनी आता स्थायी समितीकडे आपले लक्ष केंद्रित केले असून, स्थायीवर कशाप्रकारे कब्जा करता येईल, यादृष्टीने आकडेमोड करत हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थायी समितीवर १६ सदस्य नियुक्त करायचे आहेत. राजकीय पक्षांच्या महापालिकेतील संख्याबळानुसार कोटा ठरविला जातो, त्यानुसार सदस्यांची नियुक्ती केली जात असते. स्थायी समितीवर प्रतिसदस्य ७.६२ चा कोटा निश्चित आहे. त्यानुसार, भाजपाच्या ६६ संख्याबळानुसार ८.६५ म्हणजे ९ सदस्य स्थायीवर नियुक्त होऊ शकतात, तर शिवसेनेचे ३५ संख्याबळ असल्याने ४.५९ प्रमाणे ५ सदस्य नियुक्त होऊ शकतात.
कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने त्यांच्या एकूण १२ सदस्यांपैकी १.५७ म्हणजे दोन सदस्य स्थायीवर जाऊ शकतात. मात्र, विरोधकांची आघाडी करत भाजपाचे संख्याबळ ९ वरून ८ वर आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी व आघाडी नोंदणीसंबंधी माहिती घेतली जात आहे. भाजपाचे ८ आणि विरोधकांचेही ८ सदस्य स्थायीवर नियुक्त झाल्यास समसमान संख्याबळ होऊन चिठ्ठी पद्धतीने विरोधकांचे सभापतिपदासाठी नशीब उजळू शकते, असे गणित मांडले जात आहे. परंतु, शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केली तरी त्यांचे सातच्या वर सदस्य नियुक्त होणार नाहीत, असा दावा भाजपाच्या सूत्रांकडून केला जात आहे. (प्रतिनिधी)