घोरवड घाटातील वळण धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:40 AM2019-11-26T00:40:55+5:302019-11-26T00:43:03+5:30
विंचुरी दळवी : सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटातील वळण धोकादायक ठरत असून, या वळणावर संरक्षण कठडे व दिशादर्शक फलक बसवावे अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
विंचुरी दळवी : सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटातील वळण धोकादायक ठरत असून, या वळणावर संरक्षण कठडे व दिशादर्शक फलक बसवावे अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
संरक्षक कठडे व दिशादर्शक फलक नसल्यामुळे घोरवड घाटातील वळण धोकादायक बनले आहे. वाहनधारकांना वळणाचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. सिन्नरकडून घोटीकडे येण्यासाठी उतार असल्याने वाहनांना वेग अधिक असतो, तर घोटीकडून सिन्नरकडे जाणारी वाहने चढ असल्याने हळू असतात. सिन्नरकडून येणारी वाहने वळणावर संरक्षक कठडे नसल्याने सरळ दरीत जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी या वळणावर अपघात होऊन चार-पाच जणांना जीव गमवावा लागला होता. वळणाचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहने घाटाच्या खाली गेली आहेत. मुंबईकडील साईभक्तसुद्धा याच मार्गाचा अवलंब करतात.
त्यांच्या जिवालाही धोका पोहोचू शकतो. स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन घाटातील अपघाती वळणावर संरक्षक कठडे व दिशादर्शक फलक बसवावे अशी मागणी करण्यात आली आहे.वाहनांची मोठी वर्दळसिन्नर-घोटी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. घोटी व सिन्नरला मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील शेतकरी आपला माल बाजारपेठेत विक्रीला नेण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. मुंबई येथून येणारे साईभक्त याच मार्गाने शिर्डीला जातात. हा मार्ग सर्वांच्या सोयीचा आहे. मात्र, घोरवड घाटातील वळण सर्वांना धोकादायक ठरत आहे.