वीज कडाडताच मोबाइल बंद करा; झाडांपासून दूर रहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:11 AM2021-07-21T04:11:59+5:302021-07-21T04:11:59+5:30
नाशिक : पावसाळ्यात आकाशात वीज चमकत असतात, तर अनेकदा वीज जमिनीवर कोसळून मोठी दुर्घटना घडते. वीज पडल्यामुळे मनुष्यहानी ...
नाशिक : पावसाळ्यात आकाशात वीज चमकत असतात, तर अनेकदा वीज जमिनीवर कोसळून मोठी दुर्घटना घडते. वीज पडल्यामुळे मनुष्यहानी तसेच जनावरेदेखील मृत्युमुखी पडत असतात. या नैसर्गिक आपत्तीला रोखता येत नसले तरी आपण आपली काळजी घेणे अपेक्षित आहे. आकाशातील विजेबाबत अनेक गैरसमज समाजात असल्यानेदेखील काही दुर्घटना घडल्या.
पावसाळ्यात वीज अंगावर पडण्याचा धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडूनदेखील आवाहन केले जाते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज अटकाव यंत्रेदेखील बसविण्यात आलेली आहेत. उंच इमारतींवरदेखील अशा प्रकारचे नियोजन केले जाते. शहरापेक्षा ग्रामीण भागातील शेतमळ्यात, डोंगरमाथा तसेच झाडांवर वीज पडून अपघात होण्याच्या घटना अधिक घडतात.
--इन्फो--
वीज कडाडताना घ्या अशी काळजी
आकाशात वीज चमकत असताना शक्यतो घरातील विजेची उपकरणे बंद करावीत, अशावेळी विजेवर चालणाऱ्या वस्तूंची दुरुस्ती, जोडणी अथवा वायरींशी खेळ करू नये, वीज पटकन अशा यंत्रणाकडे आकर्षित होत असल्याने त्यांचा वापरही यावेळी करू नये, अशावेळी पाण्यात उभे राहू नये, फोटो काढण्यासाठी मोबाइलचा वापर करूच नये, मोबाइलमध्ये वीज खेचली जाण्याचा धोका असतो.
--काेट--
वीज चमकत असताना झाडाखाली, विजेच्या खांबाखाली थांबू नये. कारण येथून वीज पास होऊ शकते. पतंगदेखील उडवू नये, गच्चीवर असाल तर खाली यावे, शक्यतो उंचावर, मोकळ्या मैदानात थांबणे धोक्याचे ठरते.
-अजित टक्के, मराठी विज्ञान परिषद.
--इन्फो--
जिल्ह्यातील वीज अटकाव यंत्रणा
जिल्ह्यात आकाशातील विजेमुळे दुर्घटना होऊ नये याबाबतची दक्षता घेतली जाते. पावसाळ्यात याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. जिल्हा प्रशासनाने याबाबतचा कृती आराखडादेखील तयार केला आहे. जिल्ह्यात २५ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा कार्यन्वित आहे. जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतींवर ही यंत्रणा कार्यान्वित आहे. त्याप्रमाणे प्रत्येक तहसील कार्यालयातही यंत्रणा बसविण्यात आली आहे.
--इन्फो--
वीज पडल्याने घडणाऱ्या घटना नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो अर्थात एनसीआरबीची आकडेवारी पाहिल्यास भारतात २०१७ मध्ये २८२५, २०१८ मध्ये २३५७ आणि २०१९ मध्ये २,८७६ इतक्या जणांचा वीज पडल्यामुळे मृत्यू झाला आहे. टेलिफोन किंवा विजेच्या खांबांखाली थांबू नका ते विजेला आकर्षित करतात.
विजा चमकत असताना मोबाइल फोनचा वापर करू नये.
--इन्फो--
वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या वारसाला राज्य शासनाकडून चार लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. महसूल, मदत व पुनर्वसन विभागातर्फे ही माहिती दिली जाते. विजेमुळे ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आलेल्या व्यक्तीस दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. वीज पडून ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ५९ हजार १०० तर ६० टक्केपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत मिळते. एका आठवड्यापेक्षा जादा काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल असल्यास १२ हजार ७०० तर एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी चार हजार ३०० रुपये इतकी मदत मिळते.