आक्रमण संघटनेवरून शहराध्यक्ष अडचणीत? छगन भुजबळांनी फटकारले?
By admin | Published: December 7, 2014 01:46 AM2014-12-07T01:46:17+5:302014-12-07T01:46:51+5:30
आक्रमण संघटनेवरून शहराध्यक्ष अडचणीत? छगन भुजबळांनी फटकारले?
नाशिक : बेरोजगार महिलांकडून पैसे गोळा करून त्यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी घडवून आणलेल्या आक्रमण संघटनेच्या प्रवेश सोहळ्याचे कवित्व संपता संपत नसून या प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची आमदार छगन भुजबळ यांनी काल कान उघडणी केल्याचे समजते. शहरातील नाशिकरोड, सामनगाव,जेलरोड, सातपुर, सिडको, देवळाली कॅम्प,भगूर यांसह विविध भागांमधून सुमारे आठ हजार महिला बुधवारी रोजगाराच्या आशेने संतोष शर्मा यांच्या आक्रमण संघटनेच्या मेळाव्यास बी. डी. भालेकर येथे बुधवारी आल्या होत्या. प्रत्येक महिलेकडून संघटनेचे सभासद व नोंदणी शुल्कापोटी ५० ते २५० रुपयांचे शुल्क घेतल्याची माहिती सभासद महिलांनी दिली होती. बेरोजगार मेळाव्याच्या निमित्ताने या महिलांचा राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केला असता या महिलांनी जोरदार आक्षेप घेतला होता. त्यावरून दुसऱ्या दिवशी संतोष शर्मा यांनी याबाबत खुलासा करीत आपल्या संघटनेला काही राजकीय विरोधक बदनाम करीत असल्याचा आरोप केला होता. झाल्या प्रकरणाची दखल घेऊन शनिवारी (दि.६) माजी पालकमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अर्जुन टिळे यांची भुजबळ फार्मवर बोलवून चांगलीच कान उघडणी केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने त्यास दुजोराही दिला असून, लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शहराध्यक्ष अर्जुन टिळे यांच्या विरोधात अंतर्गत राजकीय विरोध उफाळून आल्याचेही प्रसंग घडले होते. त्यातच नूतन कार्यकारिणी नियुक्ती अद्याप बाकी असतानाच आता या आक्रमण संघटनेच्या प्रवेश सोहळ्यावरून राष्ट्रवादीची बदनामी होत असल्याची भावना पाहता आमदार छगन भुजबळांनी टिळे यांना फटकारल्याचे कळते. (प्रतिनिधी)