एनडीसीसी प्रशासक समितीतून तुषार पगार यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 01:09 AM2021-03-24T01:09:47+5:302021-03-24T01:10:06+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सहकार खात्याने सोमवारी (दि.२२) प्रशासक नियुक्त केले खरे मात्र, त्याची शाई वाळण्याच्या आतच तुषार पगार या सदस्याने राजीनामा दिला आहे. तज्ज्ञ सदस्यांच्या या राजीनाम्यामुळे प्रशासक समितीचा प्रारंभच अडखळत झाला आहे..

Tushar Pagar resigns from NDCC Administrative Committee | एनडीसीसी प्रशासक समितीतून तुषार पगार यांचा राजीनामा

एनडीसीसी प्रशासक समितीतून तुषार पगार यांचा राजीनामा

Next
ठळक मुद्देवैयक्तिक कारण : नियुक्ती आदेशाची शाई वाळण्यापूर्वीच धक्का

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सहकार खात्याने सोमवारी (दि.२२) प्रशासक नियुक्त केले खरे मात्र, त्याची शाई वाळण्याच्या आतच तुषार पगार या सदस्याने राजीनामा दिला आहे. तज्ज्ञ सदस्यांच्या या राजीनाम्यामुळे प्रशासक समितीचा प्रारंभच अडखळत झाला आहे..
ज्येष्ठ सनदी लेखापाल तुषार पगार यांनी मंगळवारी (दि.२३) सहकार आयुक्तांना पत्र पाठवले असून त्यात सदस्यपदी नियुक्ती करून आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार मानले आहेत. मात्र, पूर्वनियोजित व्यावसायिक आणि कौटुंबिक प्राधान्यक्रमामुळे  आपण बँकेच्या कामास सध्या वेळ व न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे प्रशासक समितीतून आपले नाव वगळावे, अशी विनंती पगार यांनी केली आहे. एखाद्या विशिष्ट विषयात बँक प्रशासनाला माझ्याकडून काही कामाची गरज भासली तर त्यासाठी आपण उपलब्ध राहू, असे त्यात पगार यांनी नमूद केले आहे. 
गैरव्यवहार आणि आर्थिक व्यवहारातील अनियमितता यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ २०१७ मध्ये  रिझर्व्ह बँकेने प्रशासक मंडळ बरखास्त केले आणि प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले होते. मात्र, त्यावेळी संचालक मंडळाने उच्च न्यायालयात जाऊन रिझर्व्ह बँकेच्या कारभारास स्थगिती आणली हेाती. आता गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने अंतिम सुनावणी झाली आणि त्यात रिझर्व्ह बँकेचे आदेश कायम केल्याने अखेरीस हे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. त्यामुळे प्रशासक समितीचा मार्ग मोकळा झाला. सोमवारी (दि.२२) सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तीन सदस्यीय प्रशासकीय सदस्यीय समिती गठित केली. सहकारी सोसायटींचे सहसचिव एम. ए. अरीफ यांच्या अध्यक्षतेखालील समितीत उपनिबंधक चंद्रशेखर बारी आणि सनदी लेखापाल तुषार पगार यांची सदस्यपदी नियुक्ती केली होती. पगार यांनी जुन्या पीपल्स को ऑप. बँकेचे प्रशासक म्हणून काम केले आहे. मंगळवारी (दि.२३) या पैकी अरीफ आणि बारी  यांनी दुपारी कार्यभार स्वीकारला. मात्र, तुषार पगार यांनी सहकार आयुक्तांना पत्र पाठवले असून त्यात आपले नाव वगळण्याची विनंती केली असल्याने त्यांनी मात्र पदभार स्वीकारला नाही. सहकार खात्याला आता नवीन सदस्याचा शोध घ्यावा लागणार आहे.
बँकेची आर्थिक स्थिती बनली बिकट
नाशिक मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती जर्जर असून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. अन्य अनेक अडचणीदेखील आहेत. राजकीय नेते, त्यांचे नातेगोते असे अनेक आर्थिक संबंध बँकेच्या  व्यवहारात गुंतलेले आहेत. अशा वेळी या बँकेत काम करून या बँकेला ऊर्जितावस्था आणणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे बँकेवर काम करण्यास तज्ज्ञांना फारसे स्वारस्य नसल्याची चर्चा आहे.

Web Title: Tushar Pagar resigns from NDCC Administrative Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.