बारावी परीक्षा रद्द, पदवी, अन्य प्रवेश कसे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:28+5:302021-06-06T04:11:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताच राज्य ...

Twelfth exam canceled, degree, other admission will be | बारावी परीक्षा रद्द, पदवी, अन्य प्रवेश कसे होणार

बारावी परीक्षा रद्द, पदवी, अन्य प्रवेश कसे होणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताच राज्य शासनानेही महाराष्ट्र राज्य माध्यमित व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात परीक्षा कशी द्यावी, असा प्रश्न पडलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचा पालकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु, सीईटीच्या माध्यमातून चांगले गुण मिळविण्याचा विश्वास नसलेल्या विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे पुढील प्रवेश कसे होणार, असा प्रश्न पडला आहे. बारावीची परीक्षा रद्द झाली असली तरी त्याचा अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणावर फारसा फरक पडणार नाही. या अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर जेईई व नीटसारख्या, तर राज्य पातळीवर एमएचटीसीईटीसारख्या सामाईक प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखांचे प्रवेश घेणे शक्य होणार आहे. मात्र कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखांच्या पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेशप्रक्रिया कशा प्रकारे राबविली जाणार याकडे विद्यार्थी व पालकांसह शिक्षण संस्स्थांचेही लक्ष लागले आहे.

--

पॉइंटर -

जिल्ह्यात बारावीतील एकूण विद्यार्थी - ६७,९१८

मुले - ३६.६३४

मुली - ३१,२८४

---

प्राचार्य म्हणतात...

बारावीच्या परीक्षा रद्द होणार असल्या तरी अद्याप मूल्यांकनाची पद्धत अद्याप सष्ट झालेली नाही. मूल्यांकनाची पद्धत स्पष्ट झाल्यानंतर व शिक्षण विभागाकडून पुढील प्रवेशाविषयी निर्णय झाल्यानंतर महाविद्यालयीन स्तरावरील कारवाई होणार आहे. त्यामुळे मुल्यांकन व प्रवेशप्रक्रियेसंबधी निर्णयाची प्रतीक्षा आहे.

- डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्राचार्य, केटीएचएम महाविद्यालय, नाशिक

--

शासन अथवा विद्यापीठाचा महाविद्यालयीन प्रवेशासंदर्भात निर्णय जाहीर झाल्यानंतर मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवेशप्रक्रिया राबविली जाईल. दरवर्षी महाविद्यालय स्तरावर सीईटी घेतली जाते. मात्र कोरोनामुळे गेल्या वर्षी ती झाली नाही. आता शासनाच्या व विद्यापीठाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

- डॉ. वसत वाघ, प्राचार्य, केव्हीएन नाईक महाविद्यालय, नाशिक

---

विद्यार्थी म्हणतात...

बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्यण विद्यार्थी हिताचाच आहे. परंतु, परीक्षा झाली नाही त्यामुळे पुढील प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार असेल तर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांप्रमाणेच कला, वाणिज्य व विज्ञान पदवीसाठीही सामाईक प्रवेश परीक्षेचा विचार करणे आवश्यक आहे.

- सागर जाधव, नाशिकरोड

वैद्यकीय व तंत्रशिक्षण प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होते. त्यामुळे परीक्षा रद्द झाली तरी या शाखांना प्रवेशाची अडचण येणार नाही. उर्वरित शाखांसाठी ज्याप्रमाणे नववीच्या ५० टक्के गुणांच्या आधारे दहावीचे मूल्यांकन होईल, तसेच दहावीच्या आधारे बारावीचे मूल्यांकन करण्याचा पर्याय आहे.

- स्वाती डोंगरे, इंदिरानगर

---

पालक म्हणतात...

कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने परीक्षा रद्द करण्याचा अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. आता सीईटीपूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उच्च शिक्षणाच्या जागाही वाढविण्याची गरज आहे.

- अंजली कदम, इंदिरानगर

शासनाने राज्यातील वैद्यकीय व तंत्रशिक्षण शाखांच्या शासकीय महाविद्यालयांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळावेत यासाठी नियोजन करणे आ‌वश्यक आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरच्या राज्यांमध्ये जावे लागणार नाही.

- अविनाश पवार, उपनगर

-----

बारावीनंतरच्या संधी

- बारावीनंतर कला, वाणिज्य, विज्ञान या सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांना संबंधित शाखेतील पदवीसोबतच ५ वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध आहे. त्यासाठी राज्यस्तरावरील सीईटी द्यावी लागते.

- विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका, पदवी अभ्यासक्रम करता येतो. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमाचाही पर्याय या विद्यार्थ्यांसमोर असतो.

- फार्मसीमध्ये डी.फार्मसी आणि बी.फार्म असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

- गणित विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर शाखेत करिअर करता येते. पदवीनंतर स्वत:चा व्यवासाय तसेच नोकरीचाही पर्याय उपलब्ध आहे.

- बारावीनंतर पॅरामेडिकल, पशुवैद्यकीय, बायोटेक्नॉलॉजी, बीएस्सी ॲग्री, फॅशन डिझाईन, संरक्षण दलातील एनडीए प्रवेश, फाईन आर्ट, बीसीए, बीबीए, हॉटेल मॅनेजमेंट, मर्चंट नेव्ही असे विविध पर्याय खुले आहेत.

Web Title: Twelfth exam canceled, degree, other admission will be

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.