निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:11 AM2021-07-21T04:11:53+5:302021-07-21T04:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० टक्के म्हणजे दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के आणि बारावी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० टक्के म्हणजे दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के आणि बारावी ४० टक्के असे ठरले आहे. तिन्हीचे मिळून विद्यार्थ्यांना ॲव्हरेज गुण मिळणार आहेत. याचाच फटका बसण्याची चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे.
बारावीसाठी गुणदान करताना दहावीतील सर्वाधिक गुण असलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ३० टक्के प्रमाणात, अकरावीचे वार्षिक विषयनिहाय गुण ३० टक्के, तसेच बारावीतील वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण ४० टक्के, असे एकूण १०० टक्के गुणांचे गुणदान केले जाणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना दहावीला चांगले गुण मिळतात. परंतु ते अकरावीला थेट बारावीच्या अभ्यासक्रमाची आणि पुढील स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. अकरावीच्या अभ्यासक्रमावर फारसे लक्ष केंद्रित करीत नाहीत. त्यामुळेे विद्यार्थ्यांना दहावीत चांगले गुण असूनही अकरावीत कमी गुण मिळतात. परंतु, सध्याच्या निकाल पद्धतीत अकरावीचे गुणही गृहित धरले जाणार असल्याने त्याचा परिणाम बारावीच्या गुणवत्तेवर होऊन विद्यार्थ्यांचे अप्रत्यक्ष नुकसान होणार असल्याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे.
---
जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी...
सीबीएसई बारावीतील विद्यार्थी - १५७०
मुले - ८१५
मुली - ७५५
---
स्टेट बोर्डचे विद्यार्थी - ६७९१८
मुले - ३६६३४
मुली -३१२८४
-----
३० टक्के सूत्र गणित बिघडविणार !
बारावी निकालाचे सूत्र अकरावी आणि दहावीच्या गुणांवर आधारित असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढविली आहे. अनेक विद्यार्थी अकरावीला फारसा अभ्यास न करता थेट बारावीच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे अशाप्रकारे गुणदान झाले, तर विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच फटका बसू शकतो.
- संजय कदम, विद्यार्थी, उपनगर
बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुणदान हे अकरावी व बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे केले जाणार आहे. परंतु, यंदा प्रॅक्टिकल झालेले नाही. त्यामुळे गुणदान कसे करणार, याची माहिती अद्याप शाळेकडून मिळालेली नाही. शिवाय दहावीनंतर विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास वाढून तो अधिक गुण मिळविण्यास सक्षम बनू शकतो. अशा मूल्यांकनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.
- तनुश्री डोंगरे, विद्यार्थिनी, इंदिरानगर
विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा
- अनेक विद्यार्थी अकरावीचे वर्ष हे रेस्ट ईयर समजून अभ्यासाकडे फारसे लक्ष देत नाहीत. या विद्यार्थ्यांचे लक्ष प्रामुख्याने दहावी व बारावीच्या परीक्षांसोबत जेईई, नीट, सीईटीसारख्या प्रवेशपरीक्षांवर केंद्रित असते. ते अकरावी सहजपणे उत्तीर्ण करतात. परंतु, गुणसंपादनाकडे फारसे लक्ष देत नाहीत. अशा विद्यार्थ्यांचे यावर्षी तीन वर्षांच्या मूल्यांकनामुळे नुकसान होणार आहे. परंतु बारावीनंतरचे बहुतेक सर्वच अभ्यासक्रम सीईटीआधारे होणार असल्याने विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
- अनेक विद्यार्थ्यांना दहावीला चांगले गुण मिळतात. परंतु ते अकरावीला थेट बारावीच्या अभ्यासक्रमाची आणि पुढील स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. अकरावीच्या अभ्यासक्रमावर फारसे लक्ष केंद्रित करीत नाहीत. त्यामुळेे विद्यार्थ्यांना दहावीत चांगले गुण असूनही अकरावीला कमी गुण मिळतात. परंतु, सध्याच्या निकाल पद्धतीत अकरावीचे गुणही गृहित धरले जाणार असल्याने त्याचा परिणाम बारावीच्या गुणवत्तेवर होऊन विद्यार्थ्यांचे अप्रत्यक्ष नुकसान होणार आहे. परंतु विद्यार्थ्यांनी पुढील प्रवेश प्रक्रिया तसेच पदवी अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला विविध महाविद्यालयांतील प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.