पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे बाराशे लाभार्थी बोगस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 10:06 PM2020-10-23T22:06:53+5:302020-10-24T02:53:21+5:30
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तालुक्यातील १ हजार २०१ लाभार्थी बोगस (अपात्र) आढळून आले आहेत. त्यांच्याकडून ९८ लाख ४२ हजार एवढी लाभाची रक्कम वसूल केली जाणार आहे. यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिली आहे.
मालेगाव : पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तालुक्यातील १ हजार २०१ लाभार्थी बोगस (अपात्र) आढळून आले आहेत. त्यांच्याकडून ९८ लाख ४२ हजार एवढी लाभाची रक्कम वसूल केली जाणार आहे. यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिली आहे.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ प्रति २ हजार रुपये रक्कम देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार वर्षाला ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. गेल्या २ वर्षांपासून ही योजना
सुरू झाली आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थी शेतकरी असला पाहिजे. पती-पत्नी व १८ वर्षांखालील
अपत्य असणे गरजेचे आहे. शासकीय नोकरीत नको, अशा लाभार्थींना या योजनेचा लाभ दिला गेला. मात्र तालुक्यातील १ हजार २०१ लाभार्थींच्या कुटुंबात आयकर भरणारी व्यक्ती आढळून आली आहे. तसेच शासकीय नोकरीत असलेल्या शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले
आहे.
याप्रकरणी तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी गंभीर दखल घेतली असून, या अपात्र लाभार्थींकडून रक्कम वसुलीचे आदेश दिले आहेत. लाभ घेतलेल्या अपात्र शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयातील कक्षात पैसे जमा करावेत, असे आवाहन केले आहे. तसे न केल्यास त्यांच्याकडून सक्तीची वसुली केली जाणार आहे. ७/१२ उताऱ्यावर बोजा चढविण्याचेही आदेश तहसीलदार राजपूत यांनी दिले आहेत.
मालेगाव तालुक्यात सध्या ५४ हजार २८४ शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ दिला जात आहे. या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी तलाठी व तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार राजपूत यांनी केले आहे.