दारूबंदी सप्ताहात बारा लाखाचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 04:19 PM2017-10-05T16:19:22+5:302017-10-05T16:19:41+5:30
नाशिक : महात्मा गांधी जयंतीनिमित्त दारूबंदी सप्ताह साजरा केला जात असतानाच जिल्ह्यात दीव, दमण, दादरा नगरहवेली या राज्यातून बनावट दारूची वाहतूक करणाºया व बाळगणाºयांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम हाती घेतली असून, चार दिवसांत सुमारे बारा लाख रुपयांचा मद्याचा साठा जप्त करून पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
घोटी-सिन्नर रस्त्यावरील हॉटेल राजे पार्क या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाºयांनी अचानक तपासणी केली असता, या ठिकाणी विना परवाना मद्याची विक्री तसेच साठवणूक करण्यात आल्याचे आढळून आले. पूर्वी या हॉटेलला परमिट रूमचा परवाना होता, परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे तेथील परवाना निलंबित करण्यात आलेला असतानाही हॉटेल मालक सचिन घारे (रा. हरसुले, सिन्नर) हे दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून पथकाने छापा मारला.