मध्यचा बारा, तर बाह्यचा एकपर्यंत निकाल
By admin | Published: October 17, 2014 11:21 PM2014-10-17T23:21:11+5:302014-10-17T23:21:37+5:30
मध्यचा बारा, तर बाह्यचा एकपर्यंत निकाल
मालेगाव : मध्य व मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी येथील महसूल व निवडणूक प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. मालेगाव मध्यची मतमोजणी श्रीरामनगर येथील छत्रपती शिवाजी जिमखाना येथे, तर मालेगाव बाह्यची मतमोजणी ही सोयगाव येथील ऐश्वर्या मंगल कार्यालय येथे होणार आहे. रविवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी दोन्ही ठिकाणी प्रत्येकी १४ टेबल मांडण्यात आली आहेत. त्यानुसार मध्यमधील २१९ यंत्रांमधील मतमोजणीसाठी १५ तर बाह्यमधील २९८ यंत्रांमधील २२ फेऱ्या लागणार आहेत. तसेच पोस्टल मतदानासाठी प्रत्येकी दोन टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. सर्वप्रथम पोस्टल मतदानाची मोजणी होईल. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त होणारी पोस्टल मते ही मतमोजणीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. एका टेबलावर पाचशे याप्रमाणे पोस्टल मतमोजणी होईल. सर्व पोस्टल मतांची एकूण मोजणी आणि नंतर उमेदवारनिहाय त्याची वर्गवारी व मोजणी असे या मोजणीचे स्वरुप राहणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जवळपास अर्धा ते पाऊण तास गृहित धरला आहे. त्यानंतर साधारण साडेआठ ते पावणेनऊ वाजेच्या सुमारास इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मतमोजणीस प्रारंभ होईल. चौदा टेबलांवर एकाचवेळी चौदा मतदानयंत्रांमधील मतमोजणी होईल. मालेगाव मध्यमध्ये निवडणूक रिंगणात १२ उमेदवार असल्याने येथील एका फेरीस साधारण १५ मिनिटे तर मालेगाव बाह्यमध्ये १० उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने येथील एका फेरीस साधारण १३ मिनिटांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे मालेगाव मध्यचा अंतिम निकाल साडेअकरा ते बारा वाजता जाहीर होण्याची शक्यता आहे. मालेगाव बाह्यचा अंतिम निकाल हा दुपारी एक वाजेच्या सुमारास लागण्याची शक्यता आहे.