हिरावाडीत चंपाषष्ठीनिमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:12 AM2018-12-13T01:12:07+5:302018-12-13T01:12:32+5:30
हिरावाडी गावठाण (शक्तिनगर) येथे गुरुवारी (दि. १३) चंपाषष्ठीनिमित्त शिव मल्हार मित्रमंडळाच्या वतीने बारा गाड्या ओढण्याचा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी साडेसातला अमित देवकर यांच्या हस्ते पूजन व महाआरती होईल.
पंचवटी : हिरावाडी गावठाण (शक्तिनगर) येथे गुरुवारी (दि. १३) चंपाषष्ठीनिमित्त शिव मल्हार मित्रमंडळाच्या वतीने बारा गाड्या ओढण्याचा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी साडेसातला अमित देवकर यांच्या हस्ते पूजन व महाआरती होईल. सकाळी ९ वाजता गंगाघाटावरील खंडेराव महाराज मंदिर येथून सवाद्य मिरवणुकीला प्रारंभ होईल. ही मिरवणूक पुढे सरदारचौक, काळाराम मंदिर परिसर, नाग चौक, गजानन चौक, संजयनगरपर्यंत काढण्यात येईल, त्यानंतर पालखी विसावा व पुढे आडगाव नाक्यामार्गे हिरावाडी शक्तिनगरपर्यंत काढण्यात येईल.
शक्तिनगर येथे महाप्रसादाचे वाटप केले जाईल. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ वाजता खंडेराव महाराज मिरवणूक होणार आहे. या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित राहणार असून, भाविकांनी यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिव मल्हार मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष उदय गांगुर्डे, अध्यक्ष गणेश आंबेकर, सुनील घुटेकर, सागर आवारे, अर्जुन वायकळे आदींनी केले आहे.
अमृतधाम विडी कामगारनगर येथील शिवाजी चौकात श्रीमंत खंडेराव महाराज देवस्थानच्या वतीने चंपाषष्ठीनिमित्त गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता कावड त्यानंतर कैलास शिंदे यांच्या हस्ते अभिषेक व महाआरती, सायंकाळी पालखी मिरवणूक, रात्री ९ वाजता आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते महाआरती व त्यानंतर १० वाजता जागरण गोंधळ तसेच पहाटे ५ वाजता लंगर तोडण्याचा कार्यक्रम होणार असून, कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन शशिकांत राऊत, संजय लोंढे, यांनी केले आहे. पेठरोडवरील जय मल्हार सेवाभावी संस्थेच्या वतीने यंदाही दरवर्षीप्रमाणे चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव महाराज यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, मल्हारी राजा देवस्थान येथे चंपाषष्ठीनिमित्त पालखी सोहळा, दशावतार (बोहडा), जागरण गोंधळ व भंडाऱ्याचा कार्यक्रम होईल. यात्रोत्सवानिमित्त खंडेराव महाराज यांचा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे.
आजपासून टेकडीवर खंडोबाची यात्रा
चंपाषष्ठीनिमित देवळाली कॅम्प येथील खंडेराव टेकडी येथे गुरुवारपासून यात्रोत्सव साजरा करण्यात येणार असून, त्या निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने पिवळ्या पताकांनी मंदिर परिसर झळाळून निघाला आहे. भक्तांची गुरुवारी बेल-भंडारा उधळीत देवाची तळी भरण्यासाठी येथे सकाळपासून गर्दी होणार आहे. मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी साप्तमिक पूजाविधी होणार असल्याचे मंदिराचे पुजारी प्रकाश आमले यांनी सांगितले. त्यानंतर दुपारी ३ वाजता आमले परिवाराच्या भगूर येथील निवासस्थानापासून झेंडकाठी व पालखी मिरवणूक काढण्यात येऊन ती देवळाली शहरमार्गे खंडेराव टेकडी येथे आणण्यात येईल.