एक खिडकीचे वाजले बारा
By admin | Published: December 23, 2015 11:36 PM2015-12-23T23:36:42+5:302015-12-23T23:40:47+5:30
मनपा सिडको विभाग : सोयहोण्याऐवजी गैरसोयच अधिक
सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एक खिडकी टोकन योजनेचा कारभार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडूनच हाकला जात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कामकाज करण्यासाठी जबाबदार कर्मचारी म्हणून किमान लिपिक असलेल्या कर्मचाऱ्यास ही जबाबदारी देण्याची गरज आहे.
नागरिकांना महापालिकेशी निगडित असलेल्या कामकाजामधील अडचणी सोडविण्यासाठी व त्या दिलेल्या कालावधीतच पूर्ण करून संबंधितांना खुलासा व्हावा यासाठी मनपाच्या वतीने तत्कालीन आयुक्त कृष्णकांत भोगे यांनी सर्वच विभागात एक खिडकी टोकन योजना अंमलात आणली आहे. यामुळे नागरिकांना एकाच छताखाली त्यांची सर्व कामे करण्याची सोेय करण्यात आली आहे. या ठिकाणी नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी, जन्म, मृत्यू दाखल्यांचे अर्ज देणे यांसह नागरिकांना मनपाशी निगडित असलेल्या सर्वच कामकाजासाठी एक खिडकी टोकन योजना अंमलात आणली आहे. यावर विभागीय अधिकाऱ्यांची लक्ष देण्याची जबाबदारी आहे. तसेच या ठिकाणी असणाऱ्या लिपिक पदाच्या कर्मचाऱ्यांवर कामकाज सोपविणे बंधनकारक करण्यात आले आहे; परंतु सिडको विभागात याच एक खिडकी टोकन योजनेचा कारभार हा चतुर्थश्रेणी महिला कर्मचारी बघत आहे. यातील एक महिला कर्मचारी या बांधकाम विभागात बिगारी व इतर दोन महिला कर्मचारी ह्या शिपाई म्हणून कार्यरत आहे.
एक खिडकी टोकन विभागात नागरिकांना जन्म-मृत्यूचे अर्ज दिले जात असून घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर कामकाजासाठी नागरिकांनी दिलेली कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी ही येथील कर्मचाऱ्यांची आहे. विशेष म्हणजे दिलेले अर्ज हे संबंधित विभागाकडे पाठवून दिलेल्या मुदतीच्या आत ते नागरिकांना देणे बंधनकारक आहे. यामुळे विभागीय कार्यालयात हे काम चतुर्थश्रेणी कर्मचारी करीत असल्याने नागरिकांची गैरसोयच होत आहे. (वार्ताहर)