चित्रपटाचे शूटिंग करता-करता वीस दिवसांत गोगलगाव हगणदारीमुक्त झाले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 02:39 PM2017-12-13T14:39:39+5:302017-12-13T14:49:09+5:30
कलावंतांचा सामाजिक पुढाकार : दोन हजार लोकवस्तीच्या गावाची यशोगाथा पडद्यावर
नाशिक : मकरंद अनासपुरे हा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा नायक. अभिनयाबरोबरच सामाजिक भान असलेल्या या कलावंताने आपल्या चित्रपटाचे शूटिंग करतानाच आख्खं गावच अवघ्या २० दिवसांत हगणदारीमुक्तीसह व्यसनमुक्त करण्याचा पराक्रम केला. नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गोगलगाव या दोन हजार लोकवस्तीच्या गावाची हीच आश्चर्यकथा आता ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या पराक्रमाला नाशिकचा उमदा आणि प्रतिभावंत दिग्दर्शक सचिन शिंदेसह पल्लवी पटवर्धन, धनंजय वाबळे आणि अजय तारगे या कलावंतांच्या योगदानाचीही झालर लागलेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे गोडवे सारेच गातात, प्रत्यक्षात ही संकल्पना अंमलात आणताना मात्र अनेकांची दमछाक होते. मात्र, गोगलगावात अभिनेता मकरंद अनासपुरे व त्यांच्या सहका-यांनी घडविलेला पराक्रम हा कौतुकास्पदच नव्हे तर अनुकरणीय आहे. अनासपुरे हे स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत म्हणून काम पाहतात. स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने डॉक्युमेंटरी करण्यासाठी त्यांनी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गोगलगावची निवड केली. गावात अस्वच्छता पाचवीला पुजलेली, वेड्या बाभळींची संख्या वाढलेली आणि एकही शौचालय नसलेल्या गोगलगावात मकरंद अनासपुरे व दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी शूटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि ग्रामस्थांना विश्वासात घेत वीस दिवसांत आख्ख्या गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला. अनासपुरेंनी स्वत:च्या पदरचे दीड लाख रुपये दिले आणि लोकवर्गणीतून गावात ३०० शौचालयांची उभारणी केली. गावातच असलेल्या साखर कारखान्याकडून कच-यासाठी डस्टबिन मिळविल्या. वेड्या बाभळी तोडून टाकल्या. शाळा इमारतीची रंगरंगोटी केली. पडक्या वाड्यांची डागडुजी करत एका ठिकाणी वाचनालय सुरू केले. एका ठिकाणी ओटा बांधून सभागृहाची निर्मिती केली. गावातच दोन पानटप-या होत्या. त्या हटवताना पानटपरीचालकांचे पुनर्वसन केले. एकाला बियाणांचे, तर दुस-याला स्टेशनरीचे दुकान थाटून दिले. टपरीमुक्त गाव झाल्याने आपोआप गुटखा, सिगारेटचीही विक्री बंद झाली आणि गाव व्यसनमुक्तही होण्यास मदत झाली. शूटिंगदरम्यान अवघ्या वीस दिवसांत हा चमत्कार घडला. पुढे या डॉक्युमेंटरीची मुख्यमंत्र्यांपासून राज्यपालांपर्यंत सर्वांकडून वाहवा झाली. अभिनेता नाना पाटेकरपासून हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांनीही आपला खारीचा वाटा उचलला. हगणदारीमुक्त व व्यसनमुक्त झालेल्या या गावाला शासनाचे ग्रामस्वच्छता पारितोषिकही मिळाले. आता गोगलगावची हीच यशोगाथा अनासपुरे यांनी ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांपुढे आणली आहे. येत्या शुक्रवारी (दि. १५) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
विविध भाषांतही लवकरच प्रदर्शित
सुमित पवार निर्मित व सचिन शिंदे दिग्दर्शित ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ हा चित्रपट आता मराठीत प्रदर्शित होत आहे. परंतु, लवकरच तो भारतातल्या विविध भाषांतही आणण्याचे काम सुरू आहे. या करमणूकप्रधान चित्रपटातून स्वच्छताविषयक मंत्रही आणि संदेशही देण्यात आला आहे. या चित्रपटात अनासपुरे यांच्यासह शशांक शेंडे, प्रवीण तरडे, मानसी आठवले, नाशिकचे धनंजय वाबळे, पल्लवी पटवर्धन आणि अजय तारगे यांच्या भूमिका आहेत.