पंचवीस वर्षांपूर्वीही असाच धुडगूस
By admin | Published: January 15, 2015 11:12 PM2015-01-15T23:12:09+5:302015-01-15T23:20:19+5:30
गांधीनगर घटनेची आठवण ताजी : तीन दिवस लष्करी जवानांनी घातला होता हैदोस
नाशिक : उपनगर लगतच असलेल्या गांधीनगर वसाहतीत सुमारे २५ वर्षांपूर्वी लष्करी जवानांनी असाच धुडगूस घातल्याची आठवण उपनगर पोलीस ठाण्यावरील हल्ल्याच्या घटनेने ताजी झाली. १९९०-९१ मध्ये स्थानिक तरुणांशी झालेल्या वादानंतर तोफखाना येथील लष्करी जवानांनी गांधीनगर मार्केटमध्ये अनेकांना मारहाण केली होती. त्या तरुणांच्या शोधासाठी जवानांनी सतत तीन दिवस परिसरात दिसेल त्यास मारहाण चालविली होती. काल दिवसभर या घटनेची चर्चा परिसरात सुरू होती.
लष्करी जवानांनी उपनगर पोलीस ठाण्यावर हल्ला चढविल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यापूर्वीही अशा प्रकारचा धुडगूस येथील नागरिकांनी अनुभवला असल्याचे सांगितले. काही जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे २५ वर्षांपूर्वी गांधीनगर मार्केटमध्ये जवानांनी असाच हल्ला केला होता. त्याकाळी येथील संपूर्ण वसाहतीत कुटुंबे वास्तव्यास होती, त्यामुळे मार्केटमध्ये बरीच गर्दी होत असे. आजूबाजूच्या परिसरात कुठेही भाजीबाजार नसल्याने लष्करी जवानदेखील गांधीनगरच्या मार्केटमध्येच येत असत. १९९०-९१ मध्ये मीलिटरीचे काही जवान आणि स्थानिक मुलांमध्ये वाद झाले. यातून जवान आणि मुलांमध्ये हमरीतुमरी होऊन झटापटी झाली. या घटनेनंतर तेथून निघून गेलेले जवान आपल्या सहकाऱ्यांसह सायंकाळी दोन ते तीन मीलिटरी वाहनांमधून गांधीनगरला आले. ‘वो लडके कौन थे’ असे म्हणत त्यांनी दिसेल त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. भाजीवाले, दुकानदार याबरोबरच परिसरात फिरणारे वयोवृद्ध यांनादेखील मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जाते. काहींना घरात घुसून मारहाण करण्यात आले. लष्करी जवानांच्या त्या दिवशी कुणीही हाती लागले नाही. त्यामुळे त्यांनी सलग तीन दिवस गांधीनगरला ‘टार्गेट’ केले होते.
त्यावेळची पोलीस कुमकही कमी होती, त्यामुळे पोलिसांचा हस्तक्षेप झाला नाही. तीन दिवसानंतर जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीने लष्करी जवान शांत झाले. देशाच्या रक्षणकर्त्याविषयी सर्वसामान्यांच्या मनात अशी भीतीदायक आठवण राहणार असेल तर जवानांचा आदर्श आणि शौर्य गाथा काय सांगणार अशी भावना अनेक वयोवृद्धांनी या घटनेनंतर व्यक्त केली. (प्रतिनिधी)