वीस दिवसांत सात सोनसाखळ्या लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:19 AM2019-09-24T01:19:12+5:302019-09-24T01:19:33+5:30
गोविंदनगर, इंदिरानगर, गंगापूररोड, उपनगर, सातपूर या भागात सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यास पोलिसांना अद्याप यश येत नसल्याने महिलावर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नाशिक :गोविंदनगर, इंदिरानगर, गंगापूररोड, उपनगर, सातपूर या भागात सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यास पोलिसांना अद्याप यश येत नसल्याने महिलावर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गणेशोत्सवकाळातही सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. आगामी नवरात्रोत्सव तोंडावर आला असताना पुन्हा सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना घडू लागल्याने महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी (दि.२१) गोविंदनगर येथे रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास ज्योती सुहास सोनवणे (४४) या गृहिणी भाजीपाला खरेदी करून घरी पायी जात होत्या. यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुण चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. सुमारे ३० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोनसाखळी चोरी झाल्याची फिर्याद सोनवणे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक चेतन श्रीवंत करीत आहेत. चार दिवसांपूर्वीच सकाळी ७.३० वाजता मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. दीपालीनगर येथे माधुरी अजित रुंद्रे (६७) या ज्येष्ठ महिलेची गळ्यातील सुमारे अडीच तोळ्यांची सोनसाखळी लांबविली. रुंद्रे या सकाळी फेरफटका मारण्यासाठी जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुण चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. सुमारे ७० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. चार दिवसांत मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरी सोनसाखळीची चोरी झाल्याची घटना घडली.
नवरात्रोत्सवात मोठे आव्हान
नवरात्रोत्सवात महिला, युवती मोठ्या संख्येने सकाळी आणि रात्री घराबाहेर पडतात. यावेळी दुचाकीस्वार चोरटे सकाळी आणि सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढत असल्याचे अद्याप घडलेल्या घटनांमधून समोर आले आहे. कालिकामातेच्या दर्शनासाठी महिला विविध भागांमधून पायी पहाटे मंदिरात दाखल होतात. रात्री उशिरादेखील या भागातून महिलांची वर्दळ नवरात्रोत्सवात असणार आहे. त्यामुळे सर्वच पोलीस ठाण्यांना आपापल्या हद्दीत पहाटेपासून सायंकाळपर्यंत पोलीस गस्त अधिक सक्षम करावी लागणार आहे.
आॅगस्टमध्ये ६ घटना
चालू सप्टेंबर महिन्यात अद्याप सहा ते सात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. तसेच मागील आॅगस्ट महिन्यात सोनसाखळी चोरीच्या घटना इंदिरानगर, पंचवटी, सातपूर, सरकारवाडा, मुंबई नाका, भद्रकाली या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडल्या होत्या. एकाच दिवशी २८ आॅगस्ट रोजी तीन सोनसाखळी चोरीच्या घटनांनी शहर हादरले होते.
इंदिरानगरला ३, तर
मुंबई नाका परिसरात २ घटना
या वीस दिवसांमध्ये सोनसाखळी चोरीच्या सर्वाधिक ३ घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या तर उर्वरित २ घटना मुंबई नाका आणि १ घटना सातपूर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. सातपूर पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या घटनेत सकाळी सात वाजता दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका ७५ वर्षीय आजीबार्इंच्या श्रीमुखात भडकावून सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता.
शहराचा मध्यवर्ती परिसर ‘टार्गेट’
दुचाकीवरून येत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. सणासुदीच्या काळातही या घटनांनी डोके वर काढले असून, शहराचा मध्यवर्ती परिसर चोरट्यांकडून ‘टार्गेट’ केला जात आहे. इंदिरानगर, मुंबई नाका, सरकारवाडा या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आतापर्यंत मागील दोन महिन्यांत या प्रकारचे मोठ्या प्रमाणात गुन्हे घडले आहेत.