वादळात सोळा घरकुले नेस्तनाबूत
By admin | Published: May 12, 2017 12:49 AM2017-05-12T00:49:44+5:302017-05-12T00:50:09+5:30
सटाणा : नियम धाब्यावर बसवून लाखो रुपये खर्चाचा घरकुल घोटाळा निसर्गानेच चव्हाट्यावर आणल्याचा प्रकार लखमापूर येथे उघडकीस आला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : नियम धाब्यावर बसवून लाखो रुपये खर्चाचा घरकुल घोटाळा निसर्गानेच चव्हाट्यावर आणल्याचा प्रकार बागलाण तालुक्यातील लखमापूर येथे उघडकीस आला आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने काही क्षणात सदोष बांधकाम असलेली तब्बल सोळा घरकुले नेस्तनाबूत करून टाकली.
त्यामुळे आदिवासी कुटुंबे बेघर होऊन त्यांचा संसार उघड्यावर आला
आहे.
एवढी मोठी दुर्घटना होऊनही शासकीय यंत्रणा फिरकली नसल्याने आदिवासींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, शासनाने बेघर झालेल्या आदिवासींचे पुनर्वसन करण्याबरोबरच सदोष बांधकाम केलेल्या बत्तीस लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्याची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी
मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य पप्पू बच्छाव यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत सन २०१४-१५ मध्ये लखमापूर गावच्या २०५ लाभार्थींसाठी घरकुले मंजूर करण्यात आली होती. पैकी ३२ लाभार्थींकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नसल्यामुळे ती रखडली होती.
आदिवासी बांधव वंचित राहू नयेत म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने पंचायतच्या मालकीच्या भूखंडावर घरकुल योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु ही योजना ठेकेदारामार्फत राबविण्यात येईल, अशी अट ग्रामपंचायत प्रशासनाने टाकली. त्यानुसार सुमारे बत्तीस लाख रुपये खर्चाची योजना ठेकेदारामार्फत करण्याच्या निर्णयाला लाभार्थींनी संमती दिली. त्यानुसार हे काम एका खासगी ठेकेदाराला देण्यात आले. काही महिन्यांपूर्वी ही योजना पूर्ण करून लाभार्थींना नुकतेच
घरकुलांचे वाटप करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपूर्वी जोरदार वादळ आले आणि तब्बल सोळा घरकुले
अक्षरश: नेस्तनाबूत झाली. सुदैवाने सर्वच कुटुंबे मजुरीसाठी बाहेर गेल्याने जीवितहानी टळली.