दोनशे वादकांनी तासभर नाचविले २०१ ध्वज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:53 AM2018-09-17T00:53:38+5:302018-09-17T00:54:07+5:30
नाशिक : ‘ढोलवादन’ नाशिकची ओळख बनत चालली आहे. शहरात विविध ढोल पथके कार्यान्वित असून, यामध्ये युवक-युवतींचा वादक म्हणून सहभाग आहे. विविध सण-उत्सवांप्रसंगी ढोल पथकांकडून एकापेक्षा एक पारंपरिक ताल वाजवून वातावरणात वेगळाच रंग भरला जातो. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात बाप्पांच्या भक्तीत ढोलवादकांचा असाच सळसळता उत्साह रविवारी (दि.१६) नाशिककरांनी अनुभवला. २०१ ध्वज तासभर दोनशे वादकांनी नाचवित नवा विक्रम रचला. निमित्त होते, नटनाद ढोल-ताशा पथक, नवीन आडगाव नाका सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तासभर २०१ ध्वज नाचविण्याच्या विक्रमपर उपक्रमाचे. मागील दोन वर्षांपासून हे ढोलपथक दिंडोरीरोडवर मागील दोन वर्षांपासून सराव करीत आहेत. पथकात सुमारे २०० वादक असून या वादकांसह मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ध्वज नाचविण्याच्या उपक्रमात सहभागी होत जिनियस व वंडर बूकमध्ये विक्रम नोंदविला. हिदू संस्कृतीचा मान असलेल्या २०१ ध्वजांना ढोल-ताशांच्या विविध तालांवर सुमारे तासभर नाचवित वादक व कार्यकर्त्यांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी ६२ वादकांनी ढोल-ताशांचे वादन केले. यामध्ये ५१ ढोल तर ११ ताशांचा समावेश होता. गणेशोत्सवानिमित्त लाडक्या बाप्पांना या उपक्रमाद्वारे आगळावेगळा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. ‘नाशिक ढोल’ देशभर प्रसिद्ध असून, येथील ढोलवादनाच्या परंपरेने विक्रम नोंदविल्याने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक शाहू खैरे, कविता कर्डक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी, समाधान जाधव आदी उपस्थित होते.
मुंबई-पुणेकरांचा विक्रम मोडित
ढोल-ताशांच्या तालावर थिरकत तरुणाईकडून सलग तासभर ध्वज नाचविण्याचा विक्रम यापूर्वी मुंबई-पुणेकरांच्या नावावर आहे. मुंबईत तरुणाईने १७१ ध्वज नाचविले होते, तर पुण्यात १०१ ध्वज नाचवून विक्रम केल्याची नोंद आहे. मात्र नाशिककर ढोल-ताशा वादकांनी मुंबई-पुण्याच्या हा विक्रम मोडित काढत २०१ ध्वज सलग तासभर नाचवून नवा विक्रम रचला. हा विक्रम बघण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ ढोलवादनच नव्हे तर लयबद्ध व तालबद्ध पद्धतीने ढोल-ताशांचा आवाज यावेळी घुमत होता. आगळ्यावेगळ्या पारंपरिक तालावर वादन करत वादकांनी व ध्वजधारी युवकांनी लक्ष वेधून घेतले.