वीस वर्षांनंतर त्याच डॉक्टरकडे मुलीचीही दुर्मीळ शस्त्रक्रिया - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:15 AM2021-05-25T04:15:16+5:302021-05-25T04:15:16+5:30
नाशिक : आधीच्या पिढीतील व्यक्तीवर डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्यांची सुटका केली असल्यास, त्या डॉक्टरांवर असलेला दृढ विश्वास दशके ...
नाशिक : आधीच्या पिढीतील व्यक्तीवर डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्यांची सुटका केली असल्यास, त्या डॉक्टरांवर असलेला दृढ विश्वास दशके उलटली, तरी कसा कायम राहतो, त्याचे उदाहरण म्हणून बिहारच्या या माय-लेकीचे दुर्मीळ उदाहरण सांगता येऊ शकते. सध्या माय असलेली महिला ही २० वर्षांपूर्वी बालिका असताना तिला गुदद्वारच नसण्याच्या व्याधीतून ज्या डॉक्टरांनी तिची सुटका केली होती, त्याच डॉक्टरांचा ठावठिकाणा शोधत लॉकडाऊनच्या काळात हजार किलोमीटरचा प्रवास करून, आपल्या मुलीवर त्याच व्याधीचे ऑपरेशन करून घेण्याची घटना ही डॉक्टर आणि रुग्णांमधील बंध आजच्या काळातही किती घट्ट असतात, ते दाखवून देणारी आहे.
दुपारी ओपीडीच्या वेळी एका मध्यमवयीन गृहस्थाने बालरोग शल्यचिकित्सक डॉ. मंदार वैद्य यांच्या दालनात प्रवेश करून, ‘सर, ओळखलंत का?’ म्हणून विचारणा केली. डॉक्टरांनी आठवत नसल्याचे सांगितल्यावर, त्यांच्यासमवेत असलेल्या कन्या आणि नातीला पुढे करीत या कन्येचे तुम्ही २० वर्षांपूर्वी ऑपरेशन केल्याचे त्यांना सांगितले. ती लहान असताना तिला गुदद्वार नसल्याने नैसर्गिक विधी एकाच जागेतून होत होते, त्या वेळी तिची शस्त्रक्रिया करून तिला सामान्य जीवन बहाल केले होते. आता त्या मुलीचे लग्न होऊन ती बिहारमध्ये राहते, तिच्या कन्येलाही पुन्हा तशीच समस्या असल्याचे लक्षात आले. पण, लॉकडाऊनच्या काळात तिकडेच पाटण्याला ऑपरेशन करण्याऐवजी इकडे का आलात, अशी विचारणा केल्यानंतर, त्या सविता नामक महिलेने सांगितले, ‘आम्हाला अन्य कुठे हे ऑपरेशन चांगले करतील की नाही, याची शाश्वती नव्हती, तसेच आमच्याकडे पैसेही नसल्याने माझ्या कन्येचे ऑपरेशन तुम्हीच करावे, अशी त्यांनी विनंती केली. त्यावर डॉ. वैद्य यांनी त्यांना मी आता मनपाच्या रुग्णालयात जात नसल्याचे सांगूनही त्यांनी ऑपरेशनसाठी आग्रह धरला. वैद्यकीय भाषेत ज्याला ‘रेक्टोव्हेस्टिब्युलर फिस्टुला’ असे म्हणतात. हे ऑपरेशन खूप गुंतागुंतीचे असते. त्यामुळे सध्याच्या बिकट परिस्थितीत ते करावे की करू नये, अशा संभ्रमात असलेल्या डॉक्टरांना त्यांनी आम्ही कडक लाॅकडाऊनच्या काळात खूप हालअपेष्टा सोसत इथपर्यंत पोहोचल्याचे सांगून, गयावया केल्याने डॉक्टरांनीही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी नेल्सन हॉस्पिटलमध्ये त्या बालिकेचे विनामूल्य ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला, तसेच त्यासाठी अन्य मदतीचे हातही धावून आले. भूलतज्ज्ञ डॉ. पंकज गुप्ता यांनी विनामूल्य काम केले. रोटरी क्लब ऑफ नाशिक यांनी औषधाचा खर्च सांभाळला. ऑपरेशन दोन टप्प्यांत करावे लागले. पहिले झाल्यानंतर दीड महिन्यांनी दुसरे ऑपरेशन करण्यात आले. त्या बालिकेची दोन्ही ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्यानंतर, नुकताच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. हातात पैसा नसतानाही, फक्त डॉक्टरांवर असलेला विश्वास, श्रद्धा या बळावर विशेष म्हणजे बिहारसारख्या मागास राज्यातील एका आईने आपल्या लेकराला चांगले उपचार मिळावेत, ती बरी व्हावी, म्हणून केलेली धडपड अन् त्या मातेची तगमग बघून तिला मदत करण्यास पुढे सरसावलेले हात पाहून अद्यापही समाजात माणुसकी, विश्वास, पैशांपेक्षाही भावनेचे मोल आहे, ही भावना प्रकर्षाने जाणवली जी खूपच सुखद आहे.