सावानाची मासिक वर्गणी दुप्पट

By admin | Published: October 1, 2015 12:22 AM2015-10-01T00:22:26+5:302015-10-01T00:23:09+5:30

वार्षिक सभा : झेंडे, बेणी यांच्या रद्द सभासदत्वावरून प्रचंड गदारोळ

Twice the monthly subscription of Savana | सावानाची मासिक वर्गणी दुप्पट

सावानाची मासिक वर्गणी दुप्पट

Next

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहराच्या सांस्कृतिक वर्तुळाचे लक्ष लागून असलेली सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा अनेक मुद्द्यांवरून वादळी ठरली. तब्बल तीन तास चाललेल्या सभेत माजी अध्यक्ष मधुकर झेंडे, श्रीकांत बेणी यांचे रद्द केलेले सभासदत्व, सभासदत्वासाठीची प्रतीक्षायादी यावरून प्रचंड गदारोळ झाला. सभेत दहा वर्षांनंतर प्रथमच सभासदांच्या मासिक वर्गणीत दुपटीने वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे सावानाची मासिक वर्गणी आता दहावरून वीस रुपयांवर पोहोचली आहे.
सावानाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांतील संघर्ष शिगेला पोहोचल्याने आजची सन २०१३-१४ व २०१४-१५ ची वार्षिक सभा वादळी ठरणार, अशी अटकळ होती. त्यामुळे सावानाच्या इतिहासात प्रथमच सभेसाठी पोलीस बंदोबस्त पाचारण करण्यात आला होता. माधवराव लिमये सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. विलास औरंगाबादकर होते. सहकार्यवाह अभिजित बगदे यांनी मागील सभेचे इतिवृत्त, अहवाल वाचन केले. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली; मात्र दरम्यान पी. वाय. कुलकर्णी यांनी सावानात सभासदत्वासाठी वेटिंगवर ठेवले जात असल्याचा आक्षेप घेतला. त्यावर कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी सदर प्रतीक्षायादी कार्यालयीन सोयीसाठी असून, कोणालाही सभासदत्व नाकारले नसल्याचा खुलासा केला.
दरम्यान, बगदे सन २०१५-१६ चे अंदाजपत्रक वाचत असतानाच हंसराज वडघुले पाटील यांनी माजी अध्यक्ष झेंडे, बेणी यांच्यावर कोणत्या नियमानुसार कारवाई केली, सावानाच्या घटनेत अशी तरतूद आहे का, असा सवाल केला. या मुद्द्यावरून सभेत प्रचंड गदारोळ होऊन जहागिरदार व सभासदांत शाब्दिक चकमक उडाली. एकाच वेळी अनेक जण बोलू लागल्याने गोंधळसदृश परिस्थिती निर्माण झाली. अशा प्रकारे सभासदत्व रद्द करण्याचा अधिकार सावानाच्या सर्वसाधारण सभेलाही नसल्याचा दावा करण्यात आला. सदर कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली असून, झेंडे, बेणी यांना पुन्हा सन्मानाने सभासदत्व देण्याचा ठराव करण्याची मागणी करण्यात आली. अशी कारवाई अन्य सभासदांवरही होऊ शकते, अशी भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यावर सदर कारवाई घटनेनुसारच असून, ती तशी नसती तर न्यायालयाची स्थगिती आली असती. कोणावर सूडबुद्धीने कारवाई करायची असती, तर ती २०१२ मध्येच केली असती. चौकशी समितीच्या शिफारशीनुसारच कारवाई केल्याचे जहागिरदार यांनी सांगितले; मात्र या समितीसमोर संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधीच दिली गेली नसल्याचा मुद्दा यावेळी काहींनी उपस्थित केला. त्यावर जहागिरदार यांनी संबंधितांना लेखी अर्ज देण्याची सूचना केली. पां. भा. करंजकर, वसंत जहागिरदार, मुकुंद बेणी, आकाश पगार यांनी अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेत पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. संवित इन्फोटेकचे मोहन चव्हाणके यांनी सावानात आपली संगणक प्रणाली सुरू असूनही आपल्या नावाची बदनामी केली जात असल्याचा आरोप केला. त्यावरूनही बराच गदारोळ झाल्यानंतर सभासदांनीच वैयक्तिक विषय सभेत न घेण्याची सूचना केली. अभिमन्यू सूर्यवंशी यांनी आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी कोर्टकचेऱ्या थांबवाव्यात, ज्येष्ठ सभासदांना मध्यस्थी घालून सामंजस्याने प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला. अखेरच्या टप्प्यात सभासद मासिक वर्गणी पुनर्रचनेचा विषय गाजला. उपासनी, विनायक जोशी, अनुप्रिता पांगारकर यांनी वर्गणी वाढवण्याची सूचना केली. तिला शंकर बर्वे, वडघुले पाटील यांनी विरोध करीत वर्गणीऐवजी सभासदसंख्या वाढवण्याचे आवाहन केले. अखेर सर्वानुमते ही वाढ मंजूर करण्यात आली.
राष्ट्रगीताने सभेला प्रारंभ झाला. उपाध्यक्ष नरेश महाजन यांनी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. अध्यक्ष प्रा. औरंगाबादकर यांनी पुढच्या वेळी सभा सुटीच्या दिवशी तसेच तळमजल्यावर घेतली जाईल, असे प्रारंभीच स्पष्ट केले. कर्नल आनंद देशपांडे, प्रा. विनया केळकर, देवदत्त जोशी, स्वानंद बेदरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
सरकारवाड्याबाबत समिती
सभेत सरकारवाडा वाचनालयाची जागा परत मिळवण्याची मागणी सभासदांनी केली. त्यावर सदर जागा पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने ती मिळवण्यात अडचणी येत असल्याचे सांगत यासंदर्भात लवकरच चार ज्येष्ठ सभासदांची समिती नेमणार असल्याचे जहागिरदार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Twice the monthly subscription of Savana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.