घरफोड्या करणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 05:39 PM2018-11-18T17:39:59+5:302018-11-18T17:40:29+5:30
सिन्नर शहरातील भरवस्तीत घरफोड्या करणाऱ्या संशयित आरोपींच्या नाशिक स्थानिक गुन्हे शाखेने मुस्क्या आवळल्या आहे. या कारवाईत दोन संशयित आरोपींसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सिन्नर शहरात घरफोड्या करणारे संशयित गुन्हेगार सिन्नर येथील उद्योगभवन परिसरात आले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवार (दि.१७) रोजी शहरातील उद्योगभवन परिसरात साईमंदिराजवळ सापळा रचून घरफोड्या करणारे संशयित गुन्हेगार प्रशांत शांतीलाल वाघ (२७ रा. साईदर्शन अपार्टमेंट, सिन्नर) व राहुल दिलीप धोत्रे (२०, रा. आडवाफाटा, इदगाहजवळ सिन्नर) यांना ताब्यात घेतले. सदर आरोपींना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी सप्टेंबर महिन्यात शहरातील द्वारका नगरी परिसरात बंद घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोºया केल्याची कबुली दिली. याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात आरोपींनी चोरून नेलेले २ गॅस सिलेंडर, १ कॅमेरा, २ एलईडी टिव्ही, भ्रमणध्वनी व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकुण ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदर संशयित आरोपींनी सिन्नर शहर तसेच नाशिकरोड व सातपुर परिसरातही बंद घरांचे दरवाजे तोडून घरफोड्या केल्याची कबुली दिली. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे व अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोलीस हवालदार रवींद्र वानखेडे, प्रकाश चव्हाणके, दिलीप घुले, प्रितम लोखंडे, किरण काकड, नीलेश कातकाडे, संदीप लगड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, भुषण रानडे पथकात सहभागी होते.