देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात

By अझहर शेख | Published: October 11, 2024 10:38 AM2024-10-11T10:38:05+5:302024-10-11T11:31:42+5:30

नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये झालेल्या स्फोटात दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला आहे.

Two agniveer killed in explosion at artillery firing range at Nashik Deolali camp | देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात

देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात

Nashik Deolali Camp : नाशिकमधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षणा दरम्यान झालेल्या स्फोटादरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला आहे. तोफेचा बॉम्बगोळा फुटल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

देवळाली कॅम्प आर्टिलरी फिल्ड फायरिंग रेंज याठिकाणी अग्नीविरांची टीम तोफ चालविण्याचे प्रशिक्षण घेत असताना इंडियन फिल्ड गनद्वारे (तोफ)
बॉम्बगोळा डागत असताना झालेल्या स्फोटात दोन अग्निवीर गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. तर एक अग्निवीर जखमी असून लष्कराच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. गोहिल विश्वराज सिंग (वय२०), सैफत शीत (वय२१दोघे रा. आर्टिलरी सेंटर,  नाशिकरोड) अशी मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीरांची नावे आहेत. 

नाशिक शहरात देवळाली कॅम्प येथे स्कुल ऑफ आर्टिलरी चे शिंगवेबहुला फायरिंग रेंज आहे. अग्निवीर नाशिकरोड तोफखाना केंद्रात भरती होऊन तेथे त्यांचे लष्करी प्रशिक्षण सुरू आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अग्निविरांची एक तुकडी शिंगवे बहुलाला फायरिंग रेंज या ठिकाणी तोफेचा सराव करण्यासाठी गेलेली होती. यावेळी इंडियन फिल्ड गन क्र-४ मधून अग्निवीरांच्या चमूने बॉम्बगोळा फायर केला असता त्याचा तोफेजवळ स्फोट झाला. यामुळे बॉम्बचे शेल उडून या अग्निवीरांच्या शरीरात शिरले. तिघा जखमींना तात्काळ लष्करी अधिकारी व जवानांनी देवळाली कॅम्प हॉस्पिटलमध्ये लष्करी वाहनातून हलविले. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी गोहिल व सैफत यांना तपासून मृत घोषित केले. याबाबतची खबर देवळाली कॅम्प मिलिटरी हॉस्पिटलमध्ये असलेले हवालदार अजित कुमार यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कळविली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक पी.एस देवरे करीत आहे, अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी दिली. शुक्रवारी सकाळी आर्टिलरी च्या जवानांनी दोघांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले होते. शवविच्छेदन केल्यानंतर जवानांनी अग्निवीरांचे मृतदेह नाशिकरोड आर्टिलरी सेंटर येथे हलविले. याबाबत आर्टिलरी सेंटरकडून अधिक कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

Web Title: Two agniveer killed in explosion at artillery firing range at Nashik Deolali camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.