घरफोडीत सव्वा दोन लाखांचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 11:04 PM2021-03-10T23:04:39+5:302021-03-11T01:30:48+5:30
नाशिक : शहर व परिसरात उन्हाच्या झळा तीव्र होताच नागरिक उकाड्यापासून बचावासाठी गच्चीवर झोपण्यासाठी जाऊ लागल्याचा गैरफायदा घेत रात्रीच्यावेळी चोरट्यांकडून बंद घरे लक्ष्य करत घरफोड्या केल्या जात आहेत. नाशिक तालुक्यातील नाणेगावात दोन्ही भावंडांचे शेजारी-शेजारी असलेले बंगले फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.

नाणेगावात राहणारे काळे कुटुंबीय रात्रीच्यावेळी होणाऱ्या उकाड्यामुळे गच्चीवर झोपण्यास गेली. यावेळी बंगल्याच्या दरवाजांना त्यांनी कुलुपे लावून सुरक्षित बंदिस्त केली असताना चोरट्यांनी कुलुपे तोडून घरात प्रवेश करत रोकड, दागिणे लांबविले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात विजय रामकृष्ण काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय काळे व त्यांच्या भावाचा बंगला एकमेकांना लागूनच आहे. सोमवारी (दि.८) रात्री आपआपल्या बंगल्यांच्या गच्चीवर दोन्ही कुटुंबीय झोपण्यासाठी गेले असता, ही घटना घडली. बंद बंगल्यांचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी दोन्ही बंगल्यांच्या बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोकड असा २ लाख २५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस करीत आहेत.