लॉकडाऊन कालावधीतील अडीच महिन्यांचे वीजबिल एकत्रित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 07:10 PM2020-06-23T19:10:48+5:302020-06-23T19:11:18+5:30
देवळा : महावितरणच्या देवळा उपविभागात अडीच महिने बंद असलेले वीज मिटर रिडींग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून करण्यात आले असून ...
देवळा : महावितरणच्या देवळा उपविभागात अडीच महिने बंद असलेले वीज मिटर रिडींग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून करण्यात आले असून सदर बीलांमध्ये अव्वाच्या सव्वा आकारणी करण्यात आल्याची नागरीकांची तक्र ार असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
या बीलांमध्ये दुरूस्ती करून वाजवी बील ग्राहकांना द्यावे, प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रिडींग नंतर गेल्या अडीच महिन्यांच्या वीज वापरानुसार एकत्रित वीजबील देण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे मीटर रिडींग घेण्यात आले नाही. जानेवारी ते मार्च २०२० या तीन महिन्यातील वीज वापराच्या सरासरी युनिटप्रमाणे एप्रिल व मे या दोन महिन्याचे वीज बील आकारण्यात आले. मात्र लॉकडाऊन कालावधीत कमी वीज वापर असणाऱ्या महिन्यातील सरासरीप्रमाणे वीज बिल आकारण्यात आले होते. परंतु आता मीटर रीडिंग उपलब्ध झाल्याने ग्राहकांना देण्यात आलेले वीज बिल हे अडीच महिन्यात विभागुन (स्लॅब बेनिफिट) देण्यात आले असून ते अचूक व योग्य असल्याची माहिती वीज कंपनीचे उपअभियंता हेकडे यांनी दिली आहे .
दरम्यान, लॉकडाऊन कालावधीतील एकत्रित वीजबिलाची माहिती घेण्यासाठी तसेच स्लॅब बेनिफिट,भरलेल्या रकमेचे समायोजन, मासिक वीजवापर व स्लॅबप्रमाणे लावलेला वीजदर आदींची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी महावितरणने लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. केवळ ग्राहक क्र मांक देऊन या लिंकद्वारे वीजबिलाचा संपूर्ण हिशोब व महावितरणकडून करण्यात आलेले ग्राहकांना वीजबिलांचे विश्लेषण पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
कोविड-१९ च्या काळात ज्यांनी सरासरी आलेले वीजबिल आर्थिक अडचण असून सुद्धा भरलेले आहे त्या बिलांची एकूण रक्कम चालू बिलातून वजा करून मिळावी.
- संजय भदाणे, ग्राहक पंचायत सदस्य, लोहोणेर.