जिल्ह्यात पुन्हा अडीच हजार कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:14 AM2021-03-24T04:14:25+5:302021-03-24T04:14:25+5:30
नाशिकमध्ये अचानकपणे मागील पंधरवड्यापासून कोरोनाचा कहर झालेला पाहावयास मिळत आहे. आधी एक हजारच्या पुढे नंतर दोन हजारांचा टप्पा आणि ...
नाशिकमध्ये अचानकपणे मागील पंधरवड्यापासून कोरोनाचा कहर झालेला पाहावयास मिळत आहे. आधी एक हजारच्या पुढे नंतर दोन हजारांचा टप्पा आणि आता गेल्या तीन दिवसांपासून अडीच हजारांच्या वरच बाधित आढळत आहेत. मंगळवारी (दि.२३) शहरात १ हजार ४८० कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले तर ग्रामीण भागात ८२७ आणि मालेगावात २५९ कोरोनाचे रुग्ण आढळले. ७८ जिल्हा बाह्य कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. उपचार घेणाऱ्यांपैकी दिवसभरात १५ रुग्ण दगावले. यापैकी ९ ग्रामीण भागात तर सहा रुग्ण शहरी भागातील आहेत. तसेच २ हजार ३९३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा चढा आलेख कायम असून दाखल होणाऱ्या संशयित रुग्णांचीही संख्या दुसरीकडे वाढताना दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात २ हजार ६४२ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. आतापर्यंत ४ हजार ८०६ रुग्णांचे नमुना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. सध्या जिल्ह्यात १७ हजार २२३ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आतपर्यंत कोरोनाने जिल्ह्यात २ हजार २४७ लोकांचा बळी घेतला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासकीय यंत्रणेचीही चिंता वाढत आहे. नागरिकांनी खबरदारी घेत नियमांचे पालन करण्यावर भर देण्याची गरज दिसू लागल्याने प्रशासकीय यंत्रणेचीही चिंता वाढू लागली आहे. नागरिकांनी खबरदारी घेत नियमांचे पालन करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.