अडीच हजार विद्यार्थ्यांनी मारली दांडी राज्यसेवा परीक्षा : दोन परीक्षा केंद्रांमध्ये ऐनवेळी बदल; काहीसा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:24 AM2018-04-09T01:24:12+5:302018-04-09T01:24:12+5:30
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.८)घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेस अडीच हजारांहून अधिक उमेदवारांनी दांडी मारली.
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.८)घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेस अडीच हजारांहून अधिक उमेदवारांनी दांडी मारली. यात सकाळच्या सत्रात दोन हजार ५२६, तर दुपारच्या सत्रातील दोन हजार ५७० गैरहजर राहिले, तर सुमारे ८ हजार ३०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. पूर्वनियोजित परीक्षा केंद्रांपैकी राज्य सेवा (पूर्व) परीक्षेच्या दोन परीक्षा केंद्रांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आला होता. त्यातच शहरात राज्यसेवा परीक्षा व बारावीच्या विद्यार्थ्यांचा जेईई मेन या दोन्ही परीक्षा एकाच वेळी आल्याने परीक्षा केंद्राविषयी उमेदवारांमध्ये काहीकाळ संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. राज्यसेवा परीक्षेसाठी उपकेंद्र क्र मांक २ के. के. वाघ इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च सेंटर, येथील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था के. के. वाघ इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निकच्या इमारतीत करण्यात आली होती. राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी दोन सत्रातील राज्यसेवा पूर्वपरीक्षेस सकाळच्या पहिल्या सत्रात ८ हजार ३०६ परीक्षार्थींपैकी दोन हजार ५२६ उमेदवार गैरहजर होते, तर दुपारच्या सत्रात दोन हजार ५७० परीक्षार्थी गैरहजर राहिले. शहरातील एकूण २८ परीक्षा केंद्रांवर ७३५ केंद्र निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. या सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती परीक्षा नियंत्रक विभागाकडून देण्यात आली.