अडीच हजार सहव्याधी व्यक्तींना घ्यावे लागणार उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:46+5:302021-06-02T04:12:46+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाची घोेषणा करून आरोग्य विभागामार्फत हे अभियान राबविण्यात ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाची घोेषणा करून आरोग्य विभागामार्फत हे अभियान राबविण्यात आले. आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी, शिक्षकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित करण्यात आली. त्यात प्रामुख्याने कुटुंबात यापूर्वी काही आजार आहेत काय याची माहिती घेण्यात आली. हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडणी, मेंदू विकाराबरोबरच ताप, सर्दी खोकला, अंगदुखी, श्वसनाचा त्रासाचे रुग्ण तपासण्यात आले. नाशिक जिल्ह्यात या अभियानात मे महिन्यात सुमारे २,६३८ रुग्ण आढळून आले. अशा रुग्णांचे स्वॅब घेण्यात येऊन त्यांची अगोदर कोरोना चाचणी करण्यात आली, तर अन्य आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना त्यांच्यावर यापूर्वी उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी तसेच नियमित औषधे घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
-----------
एकूण कुटुंब संख्या-७,५३,२७१
किती कुटुंबांचे झाले सर्वेक्षण-१,३७,४५८
सर्वेक्षण प्रतिनिधींची संख्या- १,००५
सर्वेक्षणातील कर्मचारी- २२,०३२
---------------
सहव्याधी असलेल्या व्यक्ती
बागलाण- ६६
चांदवड- १९७
देवळा- ७३
दिंडोरी- २९४
इगतपुरी-३८६
कळवण- १४९
मालेगाव- १०८
नांदगाव-१२६
नाशिक- ३९
निफाड- ५६७
पेठ-५
सिन्नर-३१४
सुरगाणा-१५५
त्र्यंबक- ८१
येवला-७८
-------------------
इगतपुरीत जास्त रुग्ण- आदिवासी तालुका व दुर्गम भाग असलेल्या इगतपुरीत सर्वाधिक रुग्ण सापडले. नाशिक शहराशी असलेला जवळचा संबंध व राष्ट्रीय महामार्गामुळे मुंबईशी असलेली जवळीकता तसेच स्थानिक नागरिकांच्या दुर्लक्षामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे.
-------------
तपासणीनंतर उपचार
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गंत सापडलेल्या संशयित रुग्णांची नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात येऊन गंभीर आजारी असलेल्यांना उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अशा रुग्णांना त्यांच्या मूळ आजारावरही उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले.
------------
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्दी, खोकला, अंगदुखी, श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांची अगोदर कोरोना तपासणी करण्यासाठी स्वॅब घेण्यात आले. त्यात बाधित सापडलेल्या रुग्णांना तातडीने कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर सौम्य लक्षणे असलेल्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. वेळीच उपचार व तपासणी झाल्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत झाली.
- डॉ. कपील आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी
-------------------
कोविडचे ४३६, तर सारीचे ९४ रुग्ण
या अभियानात शारीरिक तापमान अधिक असलेले तसेच अंगदुखी, जुलाब होणारे, सर्दी, खोकला असलेले रुग्णांची तपासणी केली असता त्यात सारीचे ९४ रुग्ण सापडले.
सध्याचा कोरोनाचा काळ पाहता, अभियानात लक्षणे सापडलेल्या रुग्णांची कोरोना तपासणी केली असता त्यात ४३६ रुग्ण कोरोनाबाधित सापडण्यासही मदत झाली. अशा रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.