दोन लाखांची घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 01:31 AM2021-10-09T01:31:32+5:302021-10-09T01:33:18+5:30
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सन्मित्र वसाहतीच्या एका बंगल्याचा कडीकोयंडा तोडून दोन लाखांची घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगार विशाल उर्फ इंदा वसंत बेंद्रे व शरद अशोक कांबळे यांना गुन्हे शोध पथकाने २४ तासांच्या आत अटक करून, त्यांच्याकडून सुमारे एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे
इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सन्मित्र वसाहतीच्या एका बंगल्याचा कडीकोयंडा तोडून दोन लाखांची घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगार विशाल उर्फ इंदा वसंत बेंद्रे व शरद अशोक कांबळे यांना गुन्हे शोध पथकाने २४ तासांच्या आत अटक करून, त्यांच्याकडून सुमारे एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंचला अनुप कुमार दास गुप्ता (६८, रा.दादर मुंबई) याची बहीण शोभना अविनाश गाडगीळ (८० प्लॉट नंबर १७ सन्मित्र वसाहत रथचक्र सोसायटी इंदिरानगर) त्यांच्या पतीसमवेत राहत होत्या, परंतु गाडगीळ दाम्पत्याचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांचा बंगला येवला यांच्या ताब्यात देण्यात आला होता. या बंगल्यातील सामान बघण्यासाठी अंचला दासगुप्ता व येवला गुरुवारी (दि. ७) सकाळी साडेअकरा गेले असता, दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला आढळून आला. घरातील कपाट उघडे होते. त्यातील लॉकर तोडून त्यामधील सोन्याचे मणी मंगळसूत्र, सोन्याचे कानातले टॉप, दोन सोन्याच्या बांगड्या, चांदीच्या वस्तू आणि रोख १५ हजार रुपये असा एकूण एक लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची घटना उघडीस आली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, उपनिरीक्षक अशोक उघडे, महेश जाधव, सागर परदेशी, मुश्रीफ शेख यांनी विशाल उर्फ इंदा वसंत बंदरे (२५, रा.म्हाडा वसाहत वडाळागाव) व त्याचा मित्र शरद अशोक कांबळे (२०, रा.सावित्रीबाई फुले वसाहत, वडाळागाव) या दोघांना अटक करून, त्यांची चौकशी केली असता, दोघांनी घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या घरफोडीतील सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.