ई-पाससाठी बनावट कोविड निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:12 AM2021-05-17T04:12:39+5:302021-05-17T04:12:39+5:30
नाशिक : कोरोनाची बाधा नसल्याचा बनावट कोविड १९ निगेटिव्ह रिपोर्ट देऊन जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई-पास काढून देणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी ...
नाशिक : कोरोनाची बाधा नसल्याचा बनावट कोविड १९ निगेटिव्ह रिपोर्ट देऊन जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई-पास काढून देणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठक्कर बाजार येथे हायटेक ऑटो सोल्युशन सायबर कॅफेतून बाहेरगावी जाण्यासाठी नागरिकांना ई-पास काढून दिला जातो. यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांबरोबरच कोविड निगेटिव्ह असल्याचे बोगस प्रमाणपत्र संशयित देत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट १ ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी (दि. १४) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल राहुल सुरेश पालखेडे व त्यांचे परिचित गणेश बाळासाहेब झिंझुरके (रा. सातपूर, नाशिक) असे दोघे बनावट गि-हाईक बनून वरील कार्यालयात गेले. तेथे असलेले चंद्रकांत छगन मेतकर (५४, रा. श्री सिद्धिविनायक अपार्टमेंट, फ्लॅट नंबर ६, आरटीओ ऑफिस शेजारी, पेठरोड, पंचवटी, नाशिक) व राहुल रमेश कर्पे (३६, रा. समर्थनगर, मयांक रो-हाऊस नंबर ११, जत्रा हॉटेल मागे, मुंबई-आग्रा रोड, नाशिक) यांच्याकडे ई-पास काढण्याबाबत सांगितले. त्यासाठी त्यांनी मागितल्याप्रमाणे आवश्यक इतर कागदपत्रे दिली, मात्र कोविड निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी मागितले नाही. त्यांनी पैसे घेऊन कोविड निगेटिव्हचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याने राहुल पालखेडे यांच्या फिर्यादीवरून मेतकर व कर्पे यांना अटक केली असून त्यांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवराज बोरसे करीत आहेत.