मासे चोरी करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 01:00 AM2021-12-13T01:00:56+5:302021-12-13T01:01:33+5:30
गिरणा धरणातील भडका जातीचे मासे विनापरवाना बेकायदेशीररीत्या चोरी करून दोन रिक्षांमध्ये भरून चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
मालेगाव : गिरणा धरणातील भडका जातीचे मासे विनापरवाना बेकायदेशीररीत्या चोरी करून दोन रिक्षांमध्ये भरून चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील चोरीचे मासे व दोन ॲपेरिक्षा असा एकूण १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवारी (दि.११) सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास सायने शिवारात ही कारवाई करण्यात आली. दीपक मगरे यांनी फिर्याद दिली. गौतम दिलीप मगरे व नीलेश भाऊसाहेब उशिरे दोन्ही रा. अजंदेपाडा यांनी १२० किलो भडका जातीचे मासे किंमत ७ हजार २०० रुपये, रिक्षा (क्रमांक एमएच ४१ व्ही २४५२) व रिक्षा क्रमांक (एमएच ४१ व्ही १८४६) मध्ये घेऊन जाताना मिळून आला. अधिक तपास पोलीस नाईक बच्छाव करीत आहेत.
----
अज्ञात वाहनाची धडक; दुचाकीस्वार ठार
मालेगाव : तालुक्यातील घोडेगाव चौकीजवळ रस्त्याच्या कडेला दुचाकी (क्रमांक एमएच ४१ बीडी ३३९५) उभी करून नैसर्गिक विधी करण्यासाठी थांबला असता भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रामदास खंडू काळे (६०) रा. निंबायती हा गंभीर जखमी होऊन ठार झाला. तालुका पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. २० नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. १८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मयताचा मुलगा विजय रामदास काळे (३६) रा. जळगाव निंबायती या शिक्षकाने फिर्याद दिली. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.
-----
रमजानपुऱ्यात धाडसी घरफोडी
मालेगाव : शहरातील रमजानपुरा भागात इस्लामिया मशिदीजवळ गट नं. १६३ येथील अब्दुल कादीर मोहंमद अमीन (३८) यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील भिंतीवरून उडी मारून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने, भ्रमणध्वनी संच असा एक लाख ६८ हजारांचा ऐवज लंपास केला. रमजानपुरा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून अब्दुल कादीर यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक थोरात करीत आहेत.