दहशत! मलढोण येथे दोन दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला, दोघे किरकोळ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 02:46 AM2023-01-20T02:46:14+5:302023-01-20T02:49:06+5:30
सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मलढोण- वावी रस्त्यावर काहीजणांना बिबट्या दिसला होता. यानंतर थोड्याच वेळात बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला.
शैलेश कर्पे -
सिन्नर - तालुक्याच्या पूर्व भागातील मलढोण येथे बिबट्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीस्वारांवर हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. यात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मलढोण- वावी रस्त्यावर काहीजणांना बिबट्या दिसला होता. यानंतर थोड्याच वेळात बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला. त्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या संतोष तुकाराम धसे(१६) हा दहावी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी जखमी झाला त्याच्या पायाला बिबट्याचा पंजा लागल्याने किरकोळ दुखापत झाली.
त्यानंतर पुन्हा थोड्याच वेळात म्हणजे रात्री ८ वाजता सरोदे वस्तीवर बिबट्याने सूर्यभान चुलू सरोदे(३२) हे दुचाकी घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने सरोदे थोडक्यात बचावले. त्यांनाही किरकोळ दुखापत झाली. दोन वेगवेगळ्या रस्त्यावर या दोन घटना घडल्या.
दरम्यान, सध्या रब्बी हंगामात शेतकरी रात्रीच्या वेळी शेतीला पाणी भरण्यासाठी शेतात जात आहेत. या परिसरात रात्री बिबट्याने दोन हल्ल्या केल्याच्या दोन घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाले आहे. वन विभागाने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ही शेतकऱ्यांनी केली आहे.