चामरलेणीवर अडकलेल्या दोघा भावांची अग्निशमन दलाने केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 03:25 PM2020-02-23T15:25:57+5:302020-02-23T15:36:23+5:30
रविवारी सकाळी म्हसरूळ बोरगड शिवारातील चामरलेणी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. हे दोघेही डोंगरावर चढल्यानंतर त्यांना माथ्यावर एका भल्यामोठ्या सर्पाने दर्शन दिले. यामुळे दोघेही घाबरले आणि बिथरून सैरावैरा पळाले असता वाट चुकले.
नाशिक : म्हसरूळ शिवारातील चामरलेणी डोंगरावर ट्रेकिंगला गेलेले दोघे चुलतभाऊ डोंगरमाथ्यावर पोहचल्यानंतर रविवारी (दि.२३) भरकटले. स्थानिक युवकांनी पंचवटी अग्निशमन, म्हसरूळ पोलीसांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत दोरखंडाच्या सहाय्याने दोघांना दीड तासांच्या प्रयत्नानंतर सुरक्षितरित्या खाली उतरविले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पेठरोड दत्तनगर येथे राहणारे दिपक कोठुळे (२३), ऋ षिकेश कोठुळे (१६) हे दोघे चुलत भाऊ नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी म्हसरूळ बोरगड शिवारातील चामरलेणी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. हे दोघेही डोंगरावर चढल्यानंतर त्यांना माथ्यावर एका भल्यामोठ्या सर्पाने दर्शन दिले. यामुळे दोघेही घाबरले आणि बिथरून सैरावैरा पळाले असता वाट चुकले. दोघेही डोंगरच्या मध्यावरच अडकून पडले. यावेळी मदतीसाठी दिपकने आपल्या मोबाईलद्वारे सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षात (१०० क्रमांकावर) संपर्क साधला. यावेळी पोलिसांनी त्वरित शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयाला माहिती कळविली. त्यानंतर तत्काळ हा ‘कॉल’ पंचवटी अग्निशमन उपकेंद्राला वळविण्यात आला. घटनेची माहिती मिळताच बंबचालक बाळू पवार, फायरमन नितीन म्हस्के, धीरज पाटील, मंगेश पिंपळे हे आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तत्काळ चामरलेणी गाठली.तोपर्यंत म्हसरूळ पोलीस कर्मचारी ए.एन.पारधे, चामरलेणी वनविभागाच्या बीटचे वनमजूर भाऊराव चारोस्कर हेदेखील पोहचलेले होते. यावेळी या सगळ्यांनी मिळून दोरखंडाच्या सहाय्याने दोघा तरूणांना सुरक्षितरित्या डोंगरमाथ्यावरून खाली साडेअकरा वाजेच्या सुमारास उतरविले.