घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोटातील उपचार घेणाऱ्या २ सख्ख्या भावांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 06:14 PM2021-04-04T18:14:34+5:302021-04-04T18:15:11+5:30

Cylinder Blast : सिलिंडर बदलताना गळती होऊन शुक्रवारी घडली होती दुर्घटना

Two brothers killed in explosion of domestic gas cylinder | घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोटातील उपचार घेणाऱ्या २ सख्ख्या भावांचा मृत्यू 

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोटातील उपचार घेणाऱ्या २ सख्ख्या भावांचा मृत्यू 

Next
ठळक मुद्देरविवारी दोघा तरुण सख्ख्या भावांची प्राणज्योत मालावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अन्य जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.  

नाशिक : जुन्या नाशकातील वडाळानाका भागात असलेल्या संजरीनगर येथील एका इमारतीत शुक्रवारी (दि.2) रात्री बारा वाजेच्या सुमारास अचानकपणे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत घरातील आठ लोक जखमी झाले होते, त्यापैकी रविवार दुपारपर्यंत एकाच कुटुंबातील चौघांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. रविवारी दोघा तरुण सख्ख्या भावांची प्राणज्योत मालावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अन्य जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.  

इगतपुरीवाला चाळीच्या पाठीमागील बाजुस असलेल्या संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक ७ मध्ये राहणाऱ्या सैय्यद कुटुंबियांच्या घरी शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलिंडर बदलताना गळती होऊन स्फोट झाल्याची दुर्घटना घडली होती.  घरातील सिलिंडर रिकामे झाल्याने दुसरे सिलिंडर बसवित असताना रेग्युलेटर लावण्याचा प्रयत्न केला असता सिलिंडरमधून गॅसची वेगाने गळती होऊ लागली यामुळे घरातील पुरुषांनी सिलिंडर पेटू नये म्हणून जवळच पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये फेकले. यावेळी सिलिंडरमधील गॅस अचानकपणे सर्व घरात पसरला आणि मोठा स्फोट होऊन फ्लॅटमध्ये आगीचा भडका उडाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती.

आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत तात्काळ घरातील महिला, मुलांना जखमी अवस्थेत बाहेर काढून एका लहान टेम्पोतून तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले होते.

या दुर्घटनेत सय्यद नुसरत रहीम (वय२५), शोएब वलिऊल्ला अन्सारी (२८), मुस्कान वलिऊल्ला सय्यद (२५), नसरीन नुसरद  सय्यद (२५), सईदा शरफोद्दीन सय्यद( ४९),, आरीफ सलिम अत्तार  (५३), सय्यद लियाकत रहीम ( ३२), रमजान वलिऊल्ला अन्सारी(२२) असे आठ लोक भाजले होते. शनिवारी (दि.3) रात्री उशिरापर्यंत उपचारादरम्यान नसरीन नुसरद सय्यद (25)  सईदा शरफोद्दीन सैयद (49) या नणंद- भावजयीचा मृत्यु झाला तर रविवारी नसरीनचा पती नुसरद रहीम सैय्यद आणि त्याचा सख्खा भाऊ लियाकत रहीम सय्यद याचाही दुर्दैवाने मृत्यु झाला. नुसरद 63 तर लियाकत 27 टक्क्यांपर्यंत भाजला होता तर नणंद-भावजयी 95 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात भाजलेल्या होत्या. तसेच शोएब अन्सारी हा युवक 90 भाजला असून  प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.



सय्यद कुटुंबियांवर कोसळला द:खाचा डोंगर

जून्या नाशकातील संजरीनगर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सय्यद कुटुंबीयांवर या दुर्घटनेमुळे दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. सय्यद कुटुंबीयाने या दुर्घटनेत आपल्या दोघे तरुण मुलांसमवेत मुलगी व सुनेला कायमचे गमावले आहे. या दुर्घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी ननंद-भावजयीच्या मृतदेहांचा शोकाकुल वातावरणात दफनविधी होत नाही तोच रविवारी दोघा तरुण मुलांची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली. या घटनेने या कुटुंबीयांना मोठा धक्का दिला आहे. एकाच कुटुंबात लागोपाठ चार मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Two brothers killed in explosion of domestic gas cylinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.