चार दिवसांत सापडल्या दोन बौद्धकालीन लेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:15 AM2021-05-26T04:15:32+5:302021-05-26T04:15:32+5:30
विल्होळी : शहरातील त्रिरश्मी बुद्ध लेणीवर चार दिवसांपूर्वी दोन भिक्खू निवासगृहे आढळून आल्यानंतर आता अपूर्ण अवस्थेतील प्राचीन ...
विल्होळी : शहरातील त्रिरश्मी बुद्ध लेणीवर चार दिवसांपूर्वी दोन भिक्खू निवासगृहे आढळून आल्यानंतर आता अपूर्ण अवस्थेतील प्राचीन बुद्ध लेणीदेखील आढळून आली आहे. नाशिकमध्ये आणखी एक पुरातन वारसा आढळून आल्याने पुरातत्त्व विभागाकडून या घटनेची दखल घेत लेणीचे संवर्धन केले जाणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सापडलेल्या या लेणींमुळे बौद्ध बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोरोनाकाळातही अनेक स्थानिक हौशी गिर्यारोहक या डोंगरावर फिरायला जातात. मात्र, काही अभ्यासू लोक काही विशेष माहितीच्या शोधात फिरत असतात. अशाच पुरातत्त्व अभ्यासकांनी या लेणींचा शोध लावला. चारच दिवसांपूर्वी सापडलेल्या दोन भिक्खू निवासगृहांनंतर मंगळवारी त्रिरश्मी लेणीवर आणखीन एक प्राचीन भिक्खू निवासगृह सापडले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये एकेकाळी बौद्ध धम्माचे मोठे प्रस्थ होते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
नाशिकचे वरिष्ठ पुरातत्त्व संरक्षक सहायक राकेश शेंडे, अतुल भोसेकर, पुरातत्त्वविद मैत्रेयी भोसेकर, लिपीतज्ज्ञ सुनील खरे, वरिष्ठ कर्मचारी सलीम पटेल आणि साक्षी भोसेकर यांचा चमू मंगळवारी सकाळी त्रिरश्मी डोंगरावर सर्वेक्षण करीत असताना एका कपारीत झाडाझुडपांमध्ये अपूर्ण लेणी दिसली. या अपूर्ण अवस्थेतील भिक्खू निवासगृहाच्या संरचनेवरून व पुरातत्त्वीय अभ्यास केल्यानंतर या लेणीचा कोरण्याचा काळ इ.स.पूर्व २०० ते २५० असू शकतो, असे ट्रिबिल्सचे अध्यक्ष अतुल भोसेकर यांनी म्हटले आहे. यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व बुद्ध लेणींच्या कालमापनाच्या तारखेत बदल होऊ शकतो, असे ते म्हणाले.
आजपर्यंत नाशिकची जगप्रसिद्ध त्रिरश्मी बुद्ध लेणी समूहाचा काळ इ.स.पूर्व २०० ते इ.स.६०० समजला जात होता. परवाच्या दोन भिक्खू निवासगृहे आणि आताच सापडलेल्या अपूर्ण भिक्खू निवासगृहाचा काळ इ.स.पूर्व २०० ते इ.स.पूर्व २५० असावा, असे पुरातत्त्वीय प्रमाणांवरून दिसते. म्हणजेच येथील लेणी २२७० वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणींचे कालमापन अजून प्राचीन झाले आहे. पुरातत्त्वविद मैत्रेयी भोसेकर या लेणींचे दस्तऐवजीकरण करीत असून लवकरच ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणला सादर केले जाणार आहे. येत्या २५६५व्या बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सापडलेल्या या नवीन बुद्ध लेणींमुळे इतिहासप्रेमी, पुरातत्त्वविद आणि लेणी संवर्धकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
--कोट--
त्रिरश्मी लेणींच्या वरच्या थरावर तीन नवीन लेणी शोधून काढल्या आहेत. लेणींचे निश्चितपणे जतन व संवर्धन केले जाईल, तसेच रेखांकन व दस्तऐवजीकरण केले जाईल आणि लवकरच पाथवे व रेलिंगचे कामही केले जाईल. अस्तित्वात असलेल्या लेणींच्या थराशिवाय आणखी काही गुहा अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे संयुक्तरीत्या सर्वेक्षण केले जाईल.
-राकेश शेंडे (वरिष्ठ संरक्षक सहायक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण)
-कोट--
लेणीवर सापडलेले भिक्खू निवासगृह हे निश्चितच त्रिरश्मी बुद्ध लेणी समूहापेक्षा प्राचीन आहे आणि लेणी कोरण्याची प्राथमिक अवस्था दर्शविते. ही लेणी २२०० वर्षे किंवा त्यापेक्षाही जुनी असावी. यामुळे संशोधकांना लेणी बनविण्याच्या पद्धतीचा अभ्यास करता येईल.
-मैत्रेयी भोसेकर (पुरातत्त्वविद आणि लिपीतज्ज्ञ)
(फोटो: आर)
===Photopath===
250521\25nsk_46_25052021_13.jpg
===Caption===
चार दिवसात सापडल्या दोन बौद्धकालीन लेणी