सराईत गुन्हेगार व त्याच्या दोन साथीदारांकडून दोन गावठी कट्ट्यांसह काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 01:07 AM2018-05-01T01:07:21+5:302018-05-01T01:07:21+5:30
शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़३०) सापळा रचून सराईत गुन्हेगार व त्याच्या दोन साथीदारांकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे जप्त केले़ सौरभ राजेंद्र ढगे (२२, रा. मामलेदार चौक, निफाड), आशिषकुमार श्रीपालकुमार श्रीपाल वर्मा व महंमद समीम महंमद इलीयास अशी अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. ढगे हा सराईत गुन्हेगार असून, आशिषकुमार आणि महंमद हे त्याचे परराज्यातील साथीदार हॉटेलमध्ये काम करीत होते़
नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़३०) सापळा रचून सराईत गुन्हेगार व त्याच्या दोन साथीदारांकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे जप्त केले़ सौरभ राजेंद्र ढगे (२२, रा. मामलेदार चौक, निफाड), आशिषकुमार श्रीपालकुमार श्रीपाल वर्मा व महंमद समीम महंमद इलीयास अशी अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. ढगे हा सराईत गुन्हेगार असून, आशिषकुमार आणि महंमद हे त्याचे परराज्यातील साथीदार हॉटेलमध्ये काम करीत होते़ युनिट एकचे सहायक पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख व हवालदार बागुल यांना सराईत गुन्हेगार सौरभ ढगे हा त्र्यंबकरोडवर गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व त्यांच्या पथकाने सोमवारी (दि.३०) सापळा रचून ढगे यास ताब्यात घेऊन दोन गावठी कट्टे आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर साथीदार करण आप्पा कडूसकर याच्यासोबत काही दिवसांपूर्वी नाशिकरोड परिसरात घरफोडी केल्याचीही कबुली देत या घरातून गावठी कट्टा चोरल्याची कबुली दिली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, नागेश मोहिते, दीपक गिरमे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पोपट कारवाळ, हवालदार बाळासाहेब दोंदे, अनिल दिघोळे, वसंत पांडव, संजय मुळक यांच्या पथकाने ही कारवाई केली़
घेतली घराची झडती
पोलिसांनी घरफोडी केलेल्या घराची पाहणी केली असता तेथील भाडेकरी आशिषकुमार वर्मा हे घर सोडून गेल्याचे समजले. मात्र नाशिकरोड येथील बास्को हॉटेलमध्ये काम करून राहत असल्याची माहिती मिळाली़ पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्याने हा गावठी कट्टा महंमद इलियास याने ठेवण्यासाठी दिल्याचे समोर आले़ पोलिसांनी इलियास याचा ताबा घेऊन घराची झडती घेतली असता एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित सौरभ ढगेविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.