ट्रॅक्टर-दुचाकी दुर्घटनेत दोन जिवलग मित्र ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 12:05 AM2021-01-24T00:05:20+5:302021-01-24T00:05:44+5:30

सटाणा : वाढदिवसाच्या आनंदाच्या दिवशीच शहरातील पिंपळेश्वर रोडवरील जयेश नितीन अहिरे (२१) आणि त्याचा मित्र विशाल संजय इंगळे (२२, खमताणे ता. बागलाण) या दोघा युवकांचा दुचाकीने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

Two close friends killed in tractor-bike accident | ट्रॅक्टर-दुचाकी दुर्घटनेत दोन जिवलग मित्र ठार

ट्रॅक्टर-दुचाकी दुर्घटनेत दोन जिवलग मित्र ठार

Next
ठळक मुद्देमॉडर्न पिकअप सेंटरजवळ ही दुर्दैवी घटना घडली.

सटाणा : वाढदिवसाच्या आनंदाच्या दिवशीच शहरातील पिंपळेश्वर रोडवरील जयेश नितीन अहिरे (२१) आणि त्याचा मित्र विशाल संजय इंगळे (२२, खमताणे ता. बागलाण) या दोघा युवकांचा दुचाकीने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील मोरेनगर शिवारातील सटाणा-देवळा रस्त्यावर शुक्रवार २२ रोजी रात्री आठ वाजता मॉडर्न पिकअप सेंटरजवळ ही दुर्दैवी घटना घडली.

शुक्रवारी (दि. २२) जयेश नितीन अहिरे या युवकाचा वाढदिवस असल्याने देवळा येथील मित्राने त्याला केक कापून वाढदिवस साजरा करण्यासाठी देवळ्याला बोलावले होते. त्यामुळे रात्री आठ वाजता खमताणे येथील विशाल संजय इंगळे या मित्राला सोबत घेऊन जयेश दुचाकीवर (क्रमांक एम. एच. ४१, ए. एल. ९०९६) देवळ्याच्या दिशेने निघाला होता. शहरापासून काही अंतरावर साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील मॉडर्न पिकअप सेंटरलगत पुढे जाणार्‍या ट्रॅक्टरचा (क्रमांक एम. एच.१५, ए. एम. १५८०) अंदाज न आल्याने त्यांच्या दुचाकीने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील जयेश आणि विशाल हे दोन्ही युवक गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले.
रात्रीची वेळ असल्याने महामार्गावर वाहतूक सुरु होती. एका बसचालकाला दिव्यांच्या प्रकाशात अपघात होऊन दोन्ही युवक महामार्गावर पडल्याचे दिसले. त्याने बस थांबवून दोघांना तत्काळ उपचारासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी जाहीर केले. दरम्यान, घटनेचे वृत्त समजताच नागरिकांनी सटाणा ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती.

कुटुंबीयातील कर्ते पुरूष
अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या जयेश व विशाल हे दोघेही युवक सर्वसामान्य कुटुंबातील असून स्वभावाने मनमिळावू होते. ऐन वाढदिवसाच्या दिवशीच जयेशचा अपघाती मृत्यू झाल्याने अहिरे कुटुंबीयांसह इंगळे कुटुंबीयांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोघांच्या दुर्दैवी अपघाती मृत्युमुळे व घरातील कर्ते असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील पुढील तपास करीत आहेत.

नियमांची पायमल्ली
साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील ताहराबाद ते मंगळूर व सोग्रस फाट्यादरम्यान ट्रॅक्टरचालक कोणताही अंदाज न घेता भरधाव वेगाने वाहन चालवत असतात. त्यातच ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागच्या बाजूने रिफ्लेक्टर लावले जात नसल्याने रात्री वाहनाचा अंदाज येत नाही. तसेच ही वाहने मोठ्या आकाराचे साऊंड लावतात. यामुळे अनेकदा अपघात घडतात. यामुळे नियमांची पायमल्ली करून अपघातांना करणीभूत ठरणार्‍या अशा ट्रॅक्टरचालक आणि इतर वाहनांवर पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पंडितराव अहिरे यांनी केली आहे.

फोटो- २३ जयेश-विशाल

जयेश नितीन अहीरे व विशाल संजय इंगळे

Web Title: Two close friends killed in tractor-bike accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.