नाशिकच्या कारखान्यांत उसळला आगडोंब; ११ बंबाच्या मदतीनं आग विझवण्याचे प्रयत्न
By अझहर शेख | Published: November 5, 2023 10:49 PM2023-11-05T22:49:54+5:302023-11-05T22:50:38+5:30
११ बंबांच्या सहाय्याने आग विझविण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
नाशिक : शिंदे-नायगाव रस्त्यावर असलेल्या दोन कंपन्यांमध्ये रविवारी (दि.५) रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानकपणे भीषण आगीचा भडका उडाला. क्षणार्धात दोन कारखान्यांना आगीने कवेत घेतले. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की काही किलोमीटर अंतरावरून आकाशात आगीच्या उंचापर्यंत ज्वाला भडकलेल्या दिसत होत्या, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच नाशिक अग्निशमन दलाचे एकापाठोपाठ एक सहा बंब पहिल्या टप्प्यात घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात होते.
नाशिकरोडपासून पुढे काही अंतरावर असलेल्या मौजे शिंदे गावाच्या एमआयडीसी शिवारात असलेल्या युनिले कोटिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात शॉर्टसर्किट होऊन आगीचा भडका उडाला. या कारखान्यात रंग बनविण्याचे काम चालते. यामुळे मोठ्या प्रमाणात रंगाचे डबे व ड्रमचा साठा असल्यामुळे आगीत ते एकापाठोपाठ फुटू लागले. यामुळे आगीने अधिकच रौद्रावतार धारण केले. यामुळे जवळच्या तिरूपती बारदान कंपनीलाही आगीने वेढले. यामुळे ही कंपनीसुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. नाशिकरोड अग्निशमन उपकेंद्रावरून निघालेले दोन बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग प्रचंड प्रमाणात वाढली. नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळाच्यादिशेने धाव घेत वाहतुक व बंदोबस्ताच्या आपत्कालीन उपाययोजना केल्या. आगीत सापडलेल्या कारखान्यांच्या चौहोबाजूंनी येणाऱ्या रस्त्यांवर प्रवेश बंद करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात बंबांची संख्या ११वर पोहचली होती. रात्री उशीरापर्यंत आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर प्रयत्न करत होते.
नाशिक - शिंदे गावाजवळील तीरुपती बारदान कंपनी व युनिले कोटींग लेनो या कंपनीमध्ये उसळला आगडोंब, ५ बंब घटनास्थळी, आग विझवण्याचे जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू #Nashikpic.twitter.com/Cs7sEL4h1T
— Lokmat (@lokmat) November 5, 2023