गुळवंच येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन गायी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 05:31 PM2019-03-27T17:31:38+5:302019-03-27T17:33:06+5:30
गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास शेतात बांधलेल्या पाच गायींवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन गायी ठार झाल्या तर एक गाय किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
गुळवंच गावापासून निमगाव रस्त्याला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वाळीबा महादू भाबड यांचे शेत आहे. दुष्काळ असल्याने गावात पाण्याची टंचाई आहे. शेतात विहिरींना जेमतेम पाणी असून यामुळे त्यांची जनावरे शेतातच बांधली जातात. सकाळी दहा वाजेच्या दरम्यान भाबड शेतात आले असता त्यांना दोन गायी मृत झालेल्या असल्याचे आढळून आले. बिबट्याच्या हल्ल्यात या दोन गायी ठार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आली. घटनास्थळावर बिबट्याचे ठसे आढळून आले. घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनरक्षक शरद थोरात यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी आले. घटनेची माहिती पंचायत समिती सदस्य रोहीणी कांगणे, सरपंच कविता सानप यांना देण्यात आली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ मिलिंद भणगे यांनी शवविच्छेदन केले. यात भाबड यांचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.