उमराणे ग्रामपालिका बिनविरोध निवडीसाठी दोन कोटींची बोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:19 AM2020-12-30T04:19:47+5:302020-12-30T04:19:47+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, उमराणे येथील जागृत देवस्थान असलेल्या रामेश्वर महाराज मंदिराचे काम गेल्या सात ते आठ वर्षांपासून रखडलेले आहे. या ...

Two crore bid for Umrane Grampalika unopposed election | उमराणे ग्रामपालिका बिनविरोध निवडीसाठी दोन कोटींची बोली

उमराणे ग्रामपालिका बिनविरोध निवडीसाठी दोन कोटींची बोली

Next

मिळालेल्या माहितीनुसार, उमराणे येथील जागृत देवस्थान असलेल्या रामेश्वर महाराज मंदिराचे काम गेल्या सात ते आठ वर्षांपासून रखडलेले आहे. या मंदिराचा प्रश्न ऐरणीवर असतानाच ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. निवडणुकीवर खर्च होण्याऐवजी मंदिराला निधी उपलब्ध करून देण्यावर ग्रामस्थांचे एकमत झाले. त्यानुसार, निवडणूक बिनविरोध करण्यात यावी, यासाठी ग्रामस्थांनी सभेत ठराव मांडला होता. त्यास निवडणूक लढविणाऱ्या पारंपरिक दोन्ही गटांकडून संमती मिळाल्याने जो जास्त देणगी मिळवून देईल, त्या गटास पाच वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार बघण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, दोन कोटी पाच लाख रुपयांची बोली लावण्यात आल्याचे म्हटले जाते. मात्र, अशी बोली लागली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. उमराणे ही १७ सदस्य संख्या असलेली तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. येथील ग्रामपंचायत निवडणूक ही मोठ्या चुरशीने लढवली जाते, असा आजवरचा इतिहास आहे. येथील निवडणुकीसाठी अद्याप एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नसून, बुधवारी (दि.३०) अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी बिनविरोध निवडीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

इन्फो

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

उमराणे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी एका कांदा व्यापाऱ्याने २ कोटी ५ लाख रुपयांची बोली लावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याची राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा पसरली होती. त्याविरुद्ध प्रतिक्रियाही जनमानसातून उमटल्या. मात्र, अशी काही बोली लागल्याचा ग्रामस्थांनी इन्कार केला आहे. तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनीही अशा बोलीबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती प्राप्त झाली नसल्याचे स्पष्ट केले.

कोट...

उमराणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदाचा लिलाव वगैरे झाल्याची चर्चा निराधार आहे. अजून सरपंचपदाचे आरक्षणही जाहीर झाले नाही. त्याबाबतचा व्हायरल झालेला व्हिडीओ तोडमोड केलेला आहे. मुळात जी चर्चा व्हिडीओत दिसते आहे, ती उमराण्याचे ग्रामदैवत रामेश्वर मंदिराच्या सात वर्षांपासून रखडलेल्या कामाबाबत आहे. एक वेळ निवडणूक बिनविरोध घ्यावी आणि मंदिराच्या बांधकामासाठी निधी उभा करावा, अशी तमाम ग्रामस्थांची भावना आहे. मंदिर होणे हा गावाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यासाठी आम्ही गट-तट बाजूला ठेवून मार्ग काढत आहोत. आमचे गाव अतिशय सुसंस्कृत, सुशिक्षित व लोकशाहीवादी आहे.

- प्रशांत देवरे, माजी जि. प. सदस्य

Web Title: Two crore bid for Umrane Grampalika unopposed election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.