बंड्या मुर्तडकला दोन दिवसांची पोलीस कोठडी
By Admin | Published: June 2, 2017 01:53 AM2017-06-02T01:53:27+5:302017-06-02T01:53:45+5:30
निकम या युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला संशयित बंड्या मुर्तडकला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पंचवटीमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किरण निकम या युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला संशयित बंड्या मुर्तडकला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पंचवटीमधील नवनाथनगर परिसरात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास धारधार शस्त्राने हल्ला चढवून हल्लेखोरांनी निकमची हत्या केली होती. या हत्त्येचा बदला घेण्यासाठी निकम याचा भाऊ संशयित शेखर निकम याने या खुनातील संशयित बंड्या मुर्तडकच्या हत्येचा कट रचला होता. या कटामध्ये मात्र मुर्तडकच्या चेहऱ्याशी साम्य असलेला व उपनगर-जेलरोड परिसरातील मंगलमूर्तीनगरमध्ये एका कुटुंबाकडे कसारा येथून पाहुणा आलेल्या तुषार साबळे या विद्यार्थ्याची हत्या टोळक्याने केल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. एकूणच निकम खूनप्रकरणाशी साबळेच्या हत्येचे धागेदोरे जुळल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी मुर्तडक यास काही दिवसांपूर्वी अटक केली; मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला सराईत संशयित शेखर हा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याला अटक करण्याचे मोठे आव्हान उपनगर व पंचवटी पोलिसांपुढे आहे. निकम खुनातील संशयित आरोपी मुर्तडक यास गुरुवारी (दि.१) जिल्हा न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.