मतदानापूर्वी दोन दिवस ‘ड्राय डे’
By श्याम बागुल | Published: April 10, 2019 04:05 PM2019-04-10T16:05:04+5:302019-04-10T16:05:54+5:30
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीपासूनच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांकडून समर्थक व मतदारांचा कौल आजमाविण्याची प्रकिया सुरू करण्यात आली. त्यानुसार दिवसभर थकलेल्या कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार रात्रीच्या ‘बैठकी’तून काढण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे गेल्या महिन्यापासून शहरातील हॉटेल्स, ढाब्यांवर नेहमीपेक्षा जास्त गर्दी होऊ
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : लोकसभा निवडणूक मतदानाच्या कालावधीत उमेदवार व राजकीय पक्षांकडून मतदारांना मोठ्या प्रमाणात दारूचे वाटप केले जाते, ते रोखण्याबरोबरच दारूच्या नशेत कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याचा धोका लक्षात घेऊन निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून यंदा उमेदवारांच्या प्रचाराची समाप्ती होताच, दारू विक्रीची दुकानेही बंद करण्यात येणार असून, थेट मतदान संपल्यानंतर तीन दिवसांनी तळीरामांची सोय होणार आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीपासूनच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांकडून समर्थक व मतदारांचा कौल आजमाविण्याची प्रकिया सुरू करण्यात आली. त्यानुसार दिवसभर थकलेल्या कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार रात्रीच्या ‘बैठकी’तून काढण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे गेल्या महिन्यापासून शहरातील हॉटेल्स, ढाब्यांवर नेहमीपेक्षा जास्त गर्दी होऊ लागली असून, त्यात निवडणुकांच्या विषयांवर गप्पांचे फड रंगू लागले आहेत. कार्यकर्त्यांच्या बाबतीत उमेदवाराकडून ही सोय केली जात असली तरी प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवशी विशेष करून झोपडपट्टीवासीय मतदारांना राजकीय पक्षांकडून दारूचे वाटप केले जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व मतदारांना दाखविण्यात येणाऱ्या आमिषाला चाप बसविण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाच्या ४८ तास अगोदर सर्व प्रकारच्या मद्यविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व मद्यविक्रीची दुकाने, परमिट रूम, देशी दारू, ताडी विक्री केंद्रे २७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेनंतर बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जारी केले आहेत. उमेदवारांचा जाहीर प्रचारही २७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता संपुष्टात येणार आहे. त्यादृष्टीने दारू विक्रीची दुकानेही बंद केले जातील. २८ व २९ एप्रिल रोजी दोन्ही दिवस ही दुकाने बंद राहतील. त्यामुळे अडीच दिवस तळीरामांची गैरसोय होणार आहे. मतमोजणीच्या दिवशीही दुपारपर्यंत जरी निकाल जाहीर होणार असले तरी, त्यादिवशी संपूर्ण दिवसभर मद्यविक्री बंद ठेवण्याबरोबरच, मतमोजणी संपल्यानंतर पुढील बारा तासांपर्यंत बंदी कायम राहणार आहे. त्यामुळे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीत ‘झिंग झिंग झिंगाट’ करणे कार्यकर्त्यांना शक्य होणार नाही.