दोन दिवसाआड एकाचा अपघाती मृत्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:48 PM2017-12-26T23:48:04+5:302017-12-27T00:22:37+5:30
वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते, वाहनधारकांकडून सुरक्षितता व वाहतूक नियमांची केली जाणारी सर्रास पायमल्ली यामुळे शहरात दोन दिवसाआड एक जीवघेणा अपघात होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़
विजय मोरे ।
नाशिक : वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते, वाहनधारकांकडून सुरक्षितता व वाहतूक नियमांची केली जाणारी सर्रास पायमल्ली यामुळे शहरात दोन दिवसाआड एक जीवघेणा अपघात होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़ १ जानेवारी ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत शहरात १६३ जीवघेणे अपघात झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १४ ने वाढ झाली आहे़ प्रत्येक महिन्यात किमान १५ जीवघेणे अपघात होत असून, यात मृत्युमुखी पडणाºयांमध्ये तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक आहे़ वाढती अपघातांची संख्या लक्षात घेता ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’बरोबर ‘सुरक्षित नाशिक’चाही विचार करणे गरजेचे झाले आहे़ शहरातील वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे शहर दिवसेंदिवस ‘अनसेफ ’ होत चालले की काय अशी शंका निर्माण होणे साहजिकच आहे़ गतवर्षी शहरात १४९ जीवघेणे अपघात घडले होते, तर यावर्षी २५ डिसेंबरपर्यंत १६३ जीवघेणे अपघात घडले आहेत़ यामध्ये दुचाकी अपघातांचे व दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याची संख्या तुलनेने अधिक आहे़ डोक्याला मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे समोर आले असून, दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट आणि चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट वापरणे आवश्यक असते़ यासाठी शहरात पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशानुसार वर्षभरापासून हेल्मेट व सीट बेल्ट न वापरणाºयांवर दंडात्मक कारवाई केली जाते आहे़ वर्षानुवर्षे काही वाहनधारक वाहनांची देखभाल दुरुस्तीच करीत नाहीत़ कार्यालयातून घरी जाणाºया नोकरदारांची होणारी घाईगर्दी, बंद सिग्नल, सिग्नलची सदोष यंत्रणा, पोलीस कर्मचाºयांचे दुर्लक्ष आणि वाहनधारकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन यामुळे शहरातील सिग्नलवरील किरकोळ अपघातांमध्येही वाढ झाली आहे़
मानवी चुकांमुळे ८४ टक्के अपघात
देशात रस्ते अपघातात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो़ प्रत्येक दिवशी सरासरी ४० लोक मरण पावतात़ अपघातात मृतांच्या संख्येपैकी सुमारे ५० टक्के मृत्यू हे २० ते ४० या वयोगटातील तरुण असतात़ यातील महत्त्वाची बाब म्हणजे ८४ टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झाल्याचे चौकशीअंती समोर आले आहे़ महाराष्ट्रात सर्वाधिक अपघात हे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-नाशिक, मुंबई-गोवा, कल्याण-नगर-बीड, पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर, नगर-औरंगाबाद या महामार्गावरील रस्त्यांवर होत असून, यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़