मार्कंडेय पर्वतावर दरड कोसळून दोन भाविक जखमी; सोमवती अमावस्यानिमित्त भाविकांची गर्दी
By मनोज शेलार | Updated: July 17, 2023 16:08 IST2023-07-17T16:07:59+5:302023-07-17T16:08:17+5:30
अशातच पायवाटेचा मार्ग काढत पर्वतावर चढणाऱ्या दोन भाविकांवर दरड कोसळल्याने दोघेही गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे.

मार्कंडेय पर्वतावर दरड कोसळून दोन भाविक जखमी; सोमवती अमावस्यानिमित्त भाविकांची गर्दी
कळवण (नाशिक)- कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडालगत असलेल्या मार्कंडेय पर्वतावर आज सोमवती अमावस्यानिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच पायवाटेचा मार्ग काढत पर्वतावर चढणाऱ्या दोन भाविकांवर दरड कोसळल्याने दोघेही गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मार्कंडेय पर्वतावर दरवर्षी सोमवती अमावस्यानिमित्त यात्रा भरते. या यात्रेसाठी जिल्ह्यासह विविध राज्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यातच आज सोमवती अमावस्या असल्याने मार्कंडेय पर्वतावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बाबापूर-मुळाणे बारी मार्गे मार्कंडेय पर्वतावर जाण्यासाठी असलेल्या पायवाट मार्गावर पर्वताची चढाई करणाऱ्या दोन भाविकांवर एक 100 किलो वजनाचा दगड निखळून खाली येऊन अंगावर आल्याने बाळु गजराम चारोस्कर (वय 57) रा. दिंडोरी तळेगाव ता. दिंडोरी आणि अशोक मनोहर गायकवाड (वय 55) रा. बोरगड म्हसरुळ नाशिक हे दोघे गंभीर जखमी झाले.