लसीचे दोन डोस, प्रतिपिंड तयार, तरीही डॉक्टर बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:15 AM2021-05-09T04:15:12+5:302021-05-09T04:15:12+5:30

नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले, आरोग्यविषयक सजगता असल्याने प्रतिपिंडही तयार.. मात्र, त्यानंतरही अचानक पिंपळगाव बसवंत येथील ...

Two doses of vaccine, antibodies prepared, still infect the doctor | लसीचे दोन डोस, प्रतिपिंड तयार, तरीही डॉक्टर बाधित

लसीचे दोन डोस, प्रतिपिंड तयार, तरीही डॉक्टर बाधित

googlenewsNext

नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले, आरोग्यविषयक सजगता असल्याने प्रतिपिंडही तयार.. मात्र, त्यानंतरही अचानक पिंपळगाव बसवंत येथील डॉक्टरसह त्याच्या कुटुंबीयांना कोरोना संसर्ग झाला. त्यातही कुटुंबीय बरे झाले; परंतु डॉक्टरांना मात्र उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हायची वेळ आली. नाशिकच्या डॉक्टरांनी विषाणूचे हे बदलते स्वरूप असल्याने पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असेल तर मग लसीच्या डोसमध्ये बदल करून सुधारणा का करीत नाहीत, असा प्रश्न या डॉक्टरांनी ट्‌विटर वरून थेट पंतप्रधानांना केला आणि त्यावर खूपच मंथन झाले. अखेरीस जिल्हा शासकीय रुग्णालयाने या डॉक्टराची पुन्हा चाचणी करून नवा स्ट्रेन आहे काय याची तपासणी करण्यासाठी विषाणू संशोधन प्रयोगशाळेकडे नमुना पाठवला आहे.

नाशिक शहराजवळील पिंपळगाव बसवंत येथील वडाळीनजीक या ठिकाणी असलेल्या डॉ. निलेश झाल्टे पाटील यांच्यासंदर्भात हा प्रकार घडला आहे. सध्या त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी १५ फेब्रुवारी रोजी केारोना प्रतिबंधक लस घेतली आणि त्यानंतर २२ मार्च रोजी दुसरी लसदेखील घेतली. पिंपळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात या लसी घेतल्यानंतर आरोग्यविषयी सजगता असल्याने डॉक्टरांनी स्वत:ची प्रतिपिंड (ॲंटिबॉडी) चाचणीदेखील केली. ती २५० इतकी आली. म्हणजेच कोरोना विषाणूशी प्रतिकार करण्याची क्षमता असल्याने ती वाढली हे स्पष्ट झाले.

एकत्रित कुटुंब पध्दतीमुळे कुटुंबातील चौदा सदस्य एकत्र राहात आहेत. एप्रिल महिन्यात त्यांचे काका आणि काकू संसर्ग बाधित झाले. त्यामुळे सर्व कुटुंबीयांची चाचणी करण्यात आली. त्यात सर्वच संसर्ग बाधित असल्याचे निष्पन्न झाले. डॉ. झाल्टे यांनी सर्वांवर उपचार केले आणि ते पंधरा दिवसांत बरेही झाले. मात्र डॉ. झाल्टे यांना मात्र अशक्तपणा कायम राहिला, तापही कायम राहिला. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल व्हावे लागले.

कोट...

शासनाने प्रमाणित केलेली लस मी घेतली. त्यानंतर कोरोना झाला असला तरी लसीकरणाला माझा कोणताही विरोध नाही. लस प्रत्येकाने घेतली पाहिजे ती आवश्यक आहे. केवळ सध्याची लस दुसऱ्या टप्प्यात आढळलेल्या कोरोना विषाणूच्या स्ट्रेनला उपयुक्त ठरत नाही काय आणि तसे नसेल तर सध्याच्या मान्यताप्राप्त लसींमध्ये आणखी संशोधन करून बदलणाऱ्या स्ट्रेनला प्रतिकार करू शकेल अशी लस का करत नाही, इतकाच माझा प्रश्न आहे आणि तोच मी ट्‌विटव्दारे पंतप्रधानांना केला.

- डॉ. निलेश झाल्टे पाटील, पिंपळगाव बसवंत

इन्फो..

काय घडले ट्‌विटनंतर..

- डॉ. निलेश झाल्टे यांनी पंतप्रधानांना ट्‌विट टॅग केल्यानंतर त्यावर अनेकांनी मंथन केले तसेच प्रश्न उपस्थित केले आहेत.

- अमेरिकेतील एमडी यूसीएच विद्यापीठाचे संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. फरहान युनूस यांनी त्याची दखल घेताना लस घेतल्यानंतर अपवादात्मक स्थितीत कोविड होऊ शकतो. अमेरिकेत ०.०००८ टक्के इतके त्यांचे प्रमाण आहे. भारतानेही अशी आकडेवारी संकलित केली पाहिजे.

- जिल्हा शासकीय रुग्णालयाने डॉ. निलेश झाल्टे यांचे शनिवारी (दि.८) चाचणी घेऊन नमुने राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत.

Web Title: Two doses of vaccine, antibodies prepared, still infect the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.