राज्य नाट्यस्पर्धेतील अंतिम फेरीत आता दोन नाटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 03:27 PM2017-11-27T15:27:33+5:302017-11-27T15:28:25+5:30
नाशिक : राज्य नाट्यस्पर्धेत पुन्हा जुन्या नियमांना उजाळा देत अतिंम फेरीत दोन नाटके यंदा पासून जाणार आहेत. अर्थातच यासाठी नाटकांची संख्याही महत्वाची आहे. नऊ नाटकांच्या वर सादर झाल्यास दोन नाटके जाणार आहेत. यामुळे रंगकर्मींमध्ये उत्साह संचारला आहे. नाशिकमध्ये यंदा चांगल्या दर्जाची नाटके सादर झाल्यामुळे अंतिम फेरीत नाशिककर बाजी मारतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाराष्टÑ राज्य सांस्कृतिक कार्यसंचालनालयातर्फे घेतली जाणारी यंदाची ५७वी स्पर्धा होती. तिसाव्या राज्य नाट्यस्पर्धेपर्यंत जुन्या नियमांनुुसार स्पर्धा सुरळीत चालू होती. यानंतर अनेक नियम बदलल्याने कलावंतांचा हिरमोड झाला होता. केवळ नवीन संहिताच स्पर्धेत सादर केली जाईल असा नियम केल्यानंतर स्पर्धेत फक्त नवीनच नाटके सादर होऊ लागली. नवीन नाटकांचा सतत दुष्काळ जाणवत असल्याने अर्थातच स्पर्धेतील नाटकांची संख्या कमी झाली होती. त्याच वेळी प्रत्येक केंद्रातून एकच नाटक अंतिम फेरीत जाणार असा एक नियम तयार करण्यात आला होता. ज्या केंद्रावर वीस वीस नाटके सादर होत होती. त्या केंद्रांवरील नाटकांची संख्य पाचवर येऊन ठेपली होती. कारण नवीन नाटक मिळणे कठीण झाले होते. यापैकीच अंतिम फेरीत एकच नाटक जाणार हा नियमही कलावंतांना खटकत होता. मध्यंतरी यामुळेच स्पर्धेला मरगळ आली होती. एकच प्याला, नटसम्राट, विच्छा माझी पुरी करा या जुन्या दर्जेदार नाटकांना एकप्रकारे स्पर्धेतून बाद केले होते. यामुळे नाट्यस्पर्धा बंद पडण्याची वेळ आली होती. वारंवार मागणी करून पुन्हा जुनी नाटके स्पर्धेत सादर करण्याची मुभा मिळाली. आणि महाराष्टÑ शासनाच्या या स्पर्धेला उर्जितावस्था प्राप्त झाली. जुनी नाटके सादर करणे जरी पुन्हा सुरू झाले तरी अंतिम फेरीत एकच नाटक पाठविणे हा नियम तसाच ठेवण्यात आला होता. यंदा स्पर्धेच्या उदघाटनाच्या दिवशीच अभिनेता दीपक करंजीकर यांनी अंतिम फेरीत दोन नाटके जाण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते. पुढील वर्षापासून हा नियम लागू होईल असेही त्यांनी सांगितले होते. परंतू हा नियम याच स्पर्धेपासून सुरू करण्यात आला. जुने नाटक सादर करणे आणि अंतिम फेरीत दोन नाटकांची निवड केली जाणे हा दुग्धशर्करा योग अखेर जुळून आला.