सटाण्यात चाचणीत दोन शेतकरी बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 06:15 PM2021-05-24T18:15:23+5:302021-05-24T18:15:52+5:30
उन्हाळ कांद्याला प्रती क्विंटल सर्वाधिक १६२५रुपये भाव
सटाणा : बागलाण तालुक्यातील सटाणा बाजार समितीसह नामपुर बाजार समितीच्या करंजाड उपबाजार आवारात सोमवारपासून (दि.२४) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले. यावेळी उन्हाळ कांद्याला प्रती क्विंटल सर्वाधिक १६२५रुपये भाव मिळाला .
सटाणा व नामपुर बाजार समिती प्रशासनाने मोबाइल वर वाहन नोंदणी करून कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा केल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पहिल्या दिवशी सटाणा बाजार समितीत ४७५ कांदा वाहनांची नोंदणी करण्यात आली होती . मात्र बहुतांश शेतकरी आणि वाहन चालकाकडे कोरोना चाचणीचा अहवाल नसल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता . प्रशासनाने तत्काळ रॅपिड ॲटिजन किट उपलब्ध करून चाचणी घेण्यात आली. या चाचणी दरम्यान दोन वाहन चालक बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाकडून टाळेबंदी शिथिलते बाबत पुढील आदेश येई पर्यंत बाजार समिती प्रशासनामार्फत वाहन चालक व शेतकर्यांची चाचणी केली जाणार असल्याचे सचिव भास्करराव तांबे यांनी सांगितले . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवण्यासाठी वाहने देखील त्याच पद्धतीने लावण्यात येत असून दोन वेळा आवारात फवारणी केली जात आहे .