जिल्ह्यात कर्जामुळे दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या
By admin | Published: September 2, 2016 10:17 PM2016-09-02T22:17:39+5:302016-09-02T22:17:50+5:30
जिल्ह्यात कर्जामुळे दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या
सिन्नर : तालुक्यातल्या धनगरवाडी (पिंपळगाव) येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्त्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सिन्नर तालुक्यातील रघुनाथ पंडीत डुंबरे (५८) यांची सुमारे पाच एकर शेतजमिन आहे. गेल्या पाच वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्यांचे शेतीत उत्पन्न कमी होते. डुंबरे यांनी महाराष्ट्र बॅँक व विकास संस्थेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचे वेळेवर हप्ते फेडले जात नसल्याने ते गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली असल्याची माहिती त्यांच्या मुलाने सांगितले.
दिवसेंदिवस कर्जाची रक्कम वाढत असल्याने ते निराश झाले होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी कडवा कालव्याशेजारी असणाऱ्या सुमारे २५ फूट खोल पाण्याने भरलेल्या खड्यात उडी घेवून जीवनयात्रा संपवली. कडवा कालव्याच्या चारीचे गेट उडण्यासाठी आलेल्या पाटबंधारे खात्याचे कर्मचारी व काही शेतकऱ्यांनी सदर घटना पाहिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत डुंबरे यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर डुंबरे यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जी. एन. गुरुळे, एस. एम. साळवे अधिक तपास करीत आहेत.
सटाणा : एक अल्पभूधारक शेतकर्याने ऐन पोळ्याच्या दिवशीच विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरु वारी रात्री तालुकयातील मुळाणे येथे घडली.हिरामण खंडू नाडेकर (वय 45) असे या आत्महत्याग्रस्त शेतकर्याचे नाव आहे. सोसायटी व एक राष्ट्रीयकृत बँकेचे नाडेकर यांच्यावर साडेतीन लाखांचे कर्ज होते.कर्ज फेडण्याच्या विवंचनेतूनच त्यांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे सर्वत्र उत्साहात पोळा साजरा होत असताना तालुक्यातील मुळाणे गावात नाडेकर यांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याने गाव शोक सागरात बुडाले होते.सटाणा ग्रामीण रु ग्णालयात नाडेकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून काल रात्री उशिरा त्यांच्यावर मुळाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. आज राज्य कर्मचार्यांचा एक दिवसीय संप असल्याने तहसीलकडून अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.