बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:10 AM2019-12-13T00:10:39+5:302019-12-13T00:31:37+5:30
निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील टाकळी फाटा व तळेगाव रस्त्याच्या परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या. या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील टाकळी फाटा व तळेगाव रस्त्याच्या परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या. या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बिबट्याचा संचार वाढत असल्याने येथील नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर फिरणे अवघड झाले आहे. गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास चांदोरी येथील तळेगाव रस्ता, शिंदे वस्ती येथे राजेंद्र वाळू नयने यांच्या मालकीच्या दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याने परिसरात अजून दहशत वाढली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी नागापूर गावात अशा हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र कुठल्याही प्रकारची दखल वनविभाग घेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वनविभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली असून शेतात काम करणाऱ्या मजूरांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी बिबट्यांची पावले दिसत आहे.
चापडगाव शिवारात बिबट्याची दहशत
सिन्नर : तालुक्यातील चापडगाव शिवारात बिबट्याच्या वावरामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. दिवसाही बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने या परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या भागात बिबट्याचा कायम वावर असतो. कारण येथे मोठ्या प्रमाणात दाट झाडी, मुबलक पाणी, आजूबाजूला मोठ्या प्रमाणात डोंगर-दºया अशा सर्व गोष्टींमुळे बिबट्यासह जंगली श्वापदांचा वावर असतो. चौफुली, धामणदर भागात खूप वावर वाढला आहे. अनेक जनावरे मृत्युमुखी पडल्याची घटना घडल्या आहेत. त्यामुळे बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावण्याचे लवकरात लवकर नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.